खेड (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. ऐन दीपावलीत सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आले आहेत.रात्रीही खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे.
दीपावलीत तरी वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत ग्राहकांकडून सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवत शहरासह वेरळ, आंबवली, खोपी, खवटी, कशेडी, सुकिवली, कुडोशी, तिसंगी, बिजघर आदी प्रमुख गावांसह खाडीपट्ट्यातही वीजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. महावितरणने कारभारात सुधारणा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.










