खेडमध्ये पुन्हा अनधिकृत खोके उभारणीस वेग

 

नगर परिषद कर्मचारी वसाहती मागेच होतेय उभारणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील समर्थनगर येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोरच अनधिकृत खोक्यांची उभारणी झालेली असतानाच याच वसाहतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेतही ३ खोक्यांची उभारणी करण्यात आली आहे. रातोरात खोके उभे रहात असतानाही येथे वास्तव्यास असलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नगरपरिषद हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागा हेरत त्याठिकाणी रातोरात अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात ३० हून अधिक विनापरवाना खोक्यांची उभारणी केली असतानाही नगरप्रशासन मात्र हाताची घडी अनू तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानत असल्याने इतरांचेही फावत आहे.

समर्थनगर येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीनजीक मोकळ्या जागेत ७ अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. यातील ३ खोक्यामध्ये दुकानेही थाटली आहेत. एकीकडे नगरपरिषद हद्दीत कुठलेही बांधकाम करताना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असतानाही अनधिकृत खोके उभारणीसाठी नगरप्रशासन परवानगी देतेच कशी, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीपाठीमागील मोकळ्या जागेत ३ खोके उभारण्यात आले आहेत.

शहर अनधिकृत खोक्यांच्या विळख्यात अडकत असताना यासाठी नेमका वरदहस्त कुणाचा, याचा उलगडा झालेला नाही. अनधिकृत खोक्यांच्या उभारणीत अनेकांचे ‘हित’ गुंतले असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी नगरप्रशासनाने अनधिकृत खोक्यांवर ‘बुलडोझर फिरवण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्यापही प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने रातोरात अनधिकृत खोके उभे रहात आहेत.