‘भारतीय ज्ञान परंपरा’वर ज्ञानदीप महाविद्यालयात व्याख्यान

 

खेड(प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगांवकर यांनी, भारतीय ज्ञान परंपरा ही हजारो वर्षे जुनी असून त्यावेळी वापरात असलेले तंत्रज्ञान, तत्वज्ञान आजच्यापेक्षा कितीतरी प्रगत होते व त्याचा वापर स्थापत्यकला, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अंतराळ संशोधन इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये आपण करत आहोत, अशी
माहिती देत भारतातील मंदिर स्थापत्यकला याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भारत व विशेषकरून दक्षिण भारतातील विविध मंदिरे व त्यांची रचना, त्या रचनेमागील विज्ञान व तेथील अचंबित करणाऱ्या अनेक वास्तू याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले. भारतामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणामागे असणारे शास्त्र कसे कार्य करते, याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती दिली
डॉ. परेश मळणगांवकर यांचा प्रा मोहसाना मुकादम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले.