रोटरी स्कूलमध्ये डॉल्फिन संरक्षण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार

 

खेड (प्रतिनिधी)

रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे डॉल्फिन संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेम आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डॉल्फिनसारख्या निरपराध जीवांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक मूल, एक झाड’, ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ आणि ‘वन्यजीव जनजागृती’ उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉल्फिनच्या जीवनशैली, त्याच्या अधिवासातील धोके, तसेच संरक्षणासाठी आवश्यक उपाय याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉल्फिन प्रतितास 60 कि.मी. पोहू शकतो आणि दर 10-15 मिनिटांनी श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. गंगेत आढळणारा डॉल्फिन नेत्रहीन असून त्याची ग्रहणशक्ती अत्यंत तीव्र असते.

शिक्षक श्री. प्रणित मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना डॉल्फिनच्या संरक्षणावर आधारित माहितीपट दाखवला, ज्यामुळे पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढीस लागली. या कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डॉल्फिनविषयक आकर्षक पोस्टर्स विशेष आकर्षण ठरले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्याध्यापिका सौ. पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन श्री. किशोर नाचरे व सौ. छाया भोजने यांनी केले.

यावेळी संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमी आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.