रक्तदान करून वाचविले गरोदर महिलेचे प्राण
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरी स्वीकारल्यानंतर रूग्णांची सेवा करीत असतानाच रूग्णसेवेचे गांभीर्य ओळखून कर्मचारी नरेश जोशी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः रक्तदान करत एका गरोदर महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रसुती विभागात एक गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान त्यांना ओ निगेटीव्ह रक्ताची आवश्यकता होती. जिल्हा रूग्णालयासह रेडक्रॉस या खाजगी रक्तपेढीतही या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. त्यानंतर रूग्णालयासह नातेवाईकांसह ओ निगेटीव्ह रक्त असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्याच्या बाहेरून आल्यामुळे महिलेच्या कुटुंबियांची रत्नागिरी शहरात फारशी ओळख नव्हती. त्यामुळे महिलेसाठी रक्त आणायचे कुठून? या विवंचनेत कुटुंबीय सापडले होते.
जिल्हा रूग्णालयात अपघात विभागात कायम हसतमुख चेहऱ्याने काम करणारे कर्मचारी नरेश जोशी यांना या घटनेची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. नरेश जोशी यांचाही रक्त गट ओ निगेटीव्ह असल्याने त्यांनी तात्काळ कुटुंबियांचा शोध घेत आपण रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान करून प्रक्रियेनंतर ते तात्काळ महिले उपलब्ध करून देण्यात येणार होते. त्यामुळे नरेश जोशी यांनी तात्काळ रक्तदान केले. त्यामुळे त्या महिलेला रक्त उपलब्ध झाले. जिल्हा रूग्णालयात सेवा करत असताना स्वतः रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवणाऱ्या नरेश जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









