जिल्ह्यात समृद्धी आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या : खा. नारायण राणे

कमिशन एजंटना दूर ठेवा व केसरकरांसारख्या चांगल्या माणसाला निवडून द्या

भावी पिढी बरबाद करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते पाणी वीज या मूलभूत सोयी आता पूर्ण झाल्या आहेत. आता येथील बेरोजगारी दूर करून पर्यटनाच्या व उद्योगधंद्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात समृद्धी आणायची आहे. मी केंद्रात असलो तरी राज्यातही माझा शब्द आजही चालतो. त्यामुळे जिल्ह्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यातही महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून त्यासाठी महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. सावंतवाडी येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आता राहीली नाही. उद्धवची सेना तशी होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी ४६ वर्षानंतर शिवसेना सत्तेत आणली. मात्र , याने केवळ अडीच वर्षात सेनेला सत्तेतून बाहेर काढले. डोळ्यादेखत चाळीसहून अधिक आमदार सत्तेतून बाहेर पडून गेले. तमाम हिंदुस्थानाचा दैवत असलेल्या बाळासाहेबांचा मुलगा शिव्या देतो हे कसलं लक्षण आहे. केवळ टीका करणे टोमणे मारणे एवढेच त्यांचे काम आहे. मुख्यमंत्री असताना केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणारे जनतेचा विकास काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोरोनाच्या काळात दुकाने बंद होती. जनतेची उपासमार होत होती. यावेळी मोदींनी ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केले. आयुष्यमान भारत योजना आणून आरोग्याच्या सुविधा पुरविल्या. हर घर जल योजनेतून घराघरात पाणी पोहोचवले. गोरगरिबांना मदत केली. हे करत असताना त्यांनी कधीही जात-पात धर्म पाहिला नाही. मात्र या उलट पवार चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते त्यांनी काय दिलं. राहुल गांधी केवळ चालत आहेत मात्र त्यांच्यासमोर कोणतेही ठोस व्हिजन नाही. त्यामुळे अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन स्वतःचं राज्याचे नुकसान करून घेण्यापेक्षा कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पुन्हा राज्यात आणूया यासाठी आशीर्वाद द्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही निवडणूक अतिमहत्त्वाची आहे. आपली माणसं कोण, त्यांच योगदान काय हे बघून मतदान करा.
लोकसभा निवडणुकीत मला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ३१ हजारांच लीड तुम्ही दिलं. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना ५० हजारांच मताधिक्य देऊन विजयी करा. महिला उमेदवार सोडून उभे असलेल्या दोघांचीही डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे मला गाढण्याची भाषा करीत आहे. मात्र माझी क्षमता तुम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे माझ्याकडे बघू पण शकत नाही. ४० वर्ष शिवसेनेत रक्त सांडलेला मी शिवसैनिक आहे. तेव्हा हे फोटो काढत फिरत होते. अजूनही ते माणसात आलेले नाही. येत्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे जंगलात पुन्हा फोटो काढायला जातील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
केसरकर यांनी येथे आमदारकीची हॅट्रिक केली आहे. विकास केलेला एकीकडे उमेदवार तर दुसरीकडे कोण उमेदवार आहे. ग्रामपंचायतीतही उभा राहीला नाही. याला राज्यसभा हवी होती. निवडणूकीनंतर मी इडीच्या मागे लागणार आहे. पैसा कुठून येतो हे पहणार आहे. दुसऱ्याला एकदा आमदार मी केला. एकही भाषण विधानपरिषदेत करू शकला नाही. कणकवलीतल्या लोकांनाही मदत करू शकला नाही. राणेंना सोडून गेलेल्या माणसाचा भाव ठाकरेंकडे वाढतो. दलाली करायची, लोकांचं शोषण करायचं काम यांनी केल. अशा लोकप्रतिनिधींना थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
केसरकर आणि मी लोकांना प्रेम दिल इथला विकास केला. मुलभूत गरजा आम्ही दिल्या.
भौतिक सुविधा आम्ही निर्माण केल्यात. आता आम्हाला इथे आता नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत. हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तूंचा कारखाना आम्ही दोडामार्गला आणत आहोत.
त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
या निवडणूकीनंतर कॉलेज बाहेर गोव्यातून सप्लाय होणारा माल कोण आणत हे समोर आणणार आहे. ब्राऊन शुगर कोणी विकत असेल तर पिढ्या बरबाद होणार आहेत.अशा लोकांना आळा घालायला हवा. त्यामुळे यांचे पैसे घेतलात तर देवळात नेऊन ठेवा. चुकीच्या मार्गांचे पैसे मी घरात आणू नका. अशा लोकांना आळा बसविण्याचे काम मी निवडणुकीनंतर करेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उद्योग धंदे करून माझं कुटुंब कमवत आहेत. दुसऱ्याच्या खिशात हात घालून पैसा मी कमावला नाही‌. राजकारणात आलो तेव्हाच मी आणि पत्तीन अशी शपथच घेतली. माझं हॉस्पिटल एकदा येऊन बघा. अनेक डॉक्टर तिथे शिकत आहेत. आमदार असताना वडीलांच्या नावानं ट्रस्ट उभं केल. गोरगरिबांना यातून उपचार करण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे‌. माझा जन्म जिल्हा आहे म्हणून कृतज्ञतेने काम करतो. आतापर्यंत मिळवलेल्या अकरा पदांचा फायदा जिल्ह्यासाठी केला.
मला तुमच्याकडून दुसर काही नको. आमच्या केसरकर, निलेश, नितेशला आशीर्वाद द्या‌. त्यांना विजयी करा. आम्ही सत्तेवर होतो,आहोत अन् राहणार आहे. त्यामुळे या फसव्या माणसांना साथ देऊ नका. केसरकर चांगला माणूस आहे. लोकांना न्याय देणाऱ्या दीपक केसरकर यांना धनुष्य बाणाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.