कोकणात महायुतीला मिळतोय उदंड प्रतिसाद
वृषाली शिंदेसह शितल म्हात्रे केसरकारांसाठी मैदानात
सावंतवाडी । प्रतिनिधी : महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. राज्यातील सर्वच घटकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. जनता महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकालावर खुश असून त्यांना पुन्हा एकदा महायुतीलाच सत्ता द्यायची आहे हे दिसून येत आहे. मात्र, त्यातही लाडकी बहीण योजनेमुळे महिला आनंदी असून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ वृषाली शिंदे यांनी रविवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार केला. नागरिकांचा प्रतिसाद पाहता मंत्री दीपक केसरकर हे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने शेतकरी, कामगार, महिला व युवकांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. लाडक्या बहिणी योजनेबरोबरच एसटी प्रवासात सवलत, तसेच मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक योजना राबविल्या आहेत. लोकांना विकास हवा आहे तसेच सुरक्षा देखील हवी आहे त्यामुळे याच मुद्द्यावर पुन्हा एकदा जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, सोनाली केसरकर, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता कविटकर, माजी नगरसेविका भारती मोरे, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, वैशाली पटेकर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.












