दापोली मतदार संघात शिवसेनेचा भगवा कायम

योगेश कदमांना गड राखण्यात यश; कार्यकर्त्यांचा जल्लोष, घोषणांनी दापोली दणाणले

मंडणगड, /प्रतिनिधी : दापोली विधानसभेत आमदार योगेश कदम यांनी आपले अस्तित्व आणि कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना शिवसेनेचा भगवा कायम फडकत ठेवला. त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करताना घोषणांनी दापोली शहर दणाणून सोडले.

 

दापोली विधानसभा निवडणुकीत एकूण झालेले मतदान आणि मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे दोन दिवस चर्चेना उधाण आले होते. यामध्ये उमेदवार संजय कदम यांना अनुकूकलता असल्याची परिस्थिती सांगण्यात येत होते. मात्र आज निकालानंतर योगेश कदम यांच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट होताना त्यांना घवघवीत मताधिक्य देत दुसऱ्यांदा विजयी केले. प्रत्येक फेरीला मिळणाऱ्या आघाडीने कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली. उत्तरोत्तर मिळणारे मताधिक्य हे वाढतच गेल्याने योगेश कदम यांनी निवडणुकीपूर्वी केलेले विजयाचे भाकीत खरे ठरले आहे. मिळणाऱ्या मताधिक्य ऐकल्यानंतर ढोलताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 

 

योगेश दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा योगेश दादा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विजयाच्या मिळणाऱ्या बातमीने कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणी गर्दी केली. पराभूत उमेदवार संजय कदम यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र विजयाचे गणित त्यांना सोडवता आले नाही. योगेश कदम यांना पहिल्या पासून मिळालेली आघाडी तोडण्यात त्यांना पूर्णतः अपयश आले. सुरवातीला अटीतटीची लढत होईल या शक्यतेला फोल ठरवीत योगेश कदम यांचे धनुष्यबाण विरोधकांना चारिमुंडया चित करणारे ठरले. विजयानंतर मंडणगड, दापोली व खेड तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शहरात फटाके फोडून जल्लोष व आनंद व्यक्त केला.