राजापूर l प्रतिनिधी : जिल्हयात सर्वच मतदार संघात सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. मात्र जिल्हयातील अन्य मतदार संघात वेगाने मतमोजणी होत असताना व फेऱ्यांचे निकाल जाहिर होत असताना राजापुरात मात्र अत्यंत संथ गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीचा निकाल तब्बल पावणे दोन तासांनी म्हणजे ९.४५ वाजता जाहिर करण्यात आला. प्रशासनाच्या या संथ कारभाराबाबत पत्रकारांसह राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनच माहिती देण्यास विलंब होत असल्याने आंम्ही आपल्यापर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरत असल्याची कबुली यावेळी मिडियाशी को ऑर्डिनेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकार कक्षातही वेळेत माहिती दिली जात नसल्याने पत्रकारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधून अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. व संथ गतीने राजापुरात मतमोजणी सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तातडीने राजापुरात येत मतमोजणी कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत आढावा घेत मतमोजणीबाबत योग्य प्रकारे वेळेत माहिती मिडियाला देण्याच्या सुचना केल्या. मात्र तरीही संथ गतीनेच मतमोजणी सुरू होती. सायंकाळी ४.३० वाजता अंतिम फेरीचा निकाल जाहिर करण्यात आला. प्रशासनाच्या या संथ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे विलंब होत होता हे पुढे आले आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील त्या नवीन असल्याने वेळ होत असल्याचे सांगितले. मात्र अशा प्रकारे जिल्हयात सर्व ठिकाणी दुपारी ३ वाजताच निकाल जाहिर झालेले असताना राजापुरा मात्र साडेचार वाजता शेवटच्या फेरीचा निकाल जाहिर करण्यात आला. तर विजयी उमेदवारांना सायंकाळी ६ वाजता विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. निवडणूक विभाग व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.










