लोकार्पणानंतरही खेड रेल्वेस्थानक सुशोभिकरण अपूर्ण

 

स्वच्छतेचा पत्ताच नाही, उर्वरित कामांची गती मंदावलेली

खेड(प्रतिनिधी) खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणासह रेल्वेस्थानक रस्ता कामाच्या लोकार्पणानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटूनही सुशोभिकरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. तसेच सुशोभिकरणातील कामात सर्वत्र अस्वच्छताच असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भागातील स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणासह रस्ता काँक्रिटीकरणासाठी ९ कोटी ९० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर
सुरू करण्यात आले मात्र कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित उपस्थित केले जाताहेत

खेड रेल्वेस्थानक सुशोभिकरणाच्या लोकार्पणानंतर दोन ते तीनवेळा झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत छताला गळती लागली होती. यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कामाचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यात आलेला दिसून येत नसल्याने दर्जा बाबत प्रन्नचिन्ह कायम आहे.

स्थानकाच्या आवारात रेल्वे इंजिनाची कलाकृती, राष्ट्रीय पक्ष मौर, शिवसृष्टीसह लक्षवेधी कलाकृती, रिक्षा व्यावसायिकांसह प्रवाशांच्या दुचाकींसाठी चारचाकी वाहनांसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था यामुळे तब्बल २९ वर्षांनी स्थानकाचा पूर्णपणे कायापालट झाला मात्र
सुशोभिकरणाचे काम अपूर्णावस्थेत असतानाही लोकार्पणाची घाई करण्यात आल्याने सदयस्थितीत प्रलंबित कामे मंद गतीने सुरू आहेत. एका बाजूकडील काम पूर्णतः अर्धवट आहे. स्थानक परिसरात एकीकडे सुशोभिकरणामुळे सुटसुटीतपणा आलेला असतानाच दुसरीकडे मात्र अस्वच्छता निर्माण झाली आहे.

लोकार्पणापासून सुशोभिकरण परिसराची स्वच्छताच करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विद्युत उपकरणांसह अन्य साहित्यही परिसरात पसरले आहे. स्वच्छतेअभावी सुशोभिकरणाच्या कामात विदुपपणा येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. परिसरातील स्वच्छता नेमकी करायची कुणी, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली काम करण्यात आल्याने स्वच्छतेची जबाबदारी देखील त्यांचीच असल्याचा सूर आळवला जात आहे.