सह्याद्री पट्ट्यातील ‘ब्लॅक पॅंथर ‘ चा अधिवास पुन्हा अधोरेखित
वनविभागाकडूनही या घटनेला दुजोरा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्री पट्ट्यात पुन्हा एकदा ‘ब्लॅक पॅंथर ‘ सिद्ध झाले आहे. आंबोलीलगत कुंभवडे येथे जंगलमय भागातून जाणाऱ्या दर्शन देसाई नामक युवकाला ब्लॅक पँथर दिसून आला. वन विभागानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यामध्ये ब्लॅक पॅंथर चा अधिवास असल्याचे याआधीही बऱ्याचदा उघड झाले होते. अनेकांनी या ब्लॅक पॅंथरला पाहिल्यानंतर त्याचे फोटो तसेच व्हिडिओ मोबाईल मध्ये ही टिपले आहेत. सह्याद्री पट्ट्यातील आंबोली तसेच तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅंथर आढळून आला होता. तर त्याच्या अस्तित्वाबाबत काही जणांकडून शंकाही उपस्थित करण्यात येत होती.
मात्र, आता पुन्हा एकदा कुंभवडे येथे आढळून आलेल्या या ब्लॅक पॅंथर मुळे त्याचा अधिवास अजून ठळकपणे अधोरेखित झाला आहे. कळणे येथील दर्शन देसाई हा युवक आपल्या ताब्यातील बोलोरो पिकप गाडीतून चंदगड येथे सिमेंट घेऊन जात असताना सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कुंभवडे येथील मंदिराशेजारील रस्त्याच्या चढतीवर त्याला हा ‘ब्लॅक पॅंथर ‘ रस्ता क्रॉस करताना दिसून आला. त्यामुळे दर्शनने गाडी थांबवली असता तो रस्ता क्रॉस करून दोन-तीन मिनिटे तो एकाच जागेवर स्थिरावला. अगदी नजरेसमोर असलेल्या या ब्लॅक पॅंथरचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपले.त्यानंतर मात्र चाहूल लागताच तिथून जंगल भागात निसटल्याचे दर्शन यांनी सांगितले. दर्शन देसाई यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र प्रसारित केल्यानंतर वनविभागाकडूनही त्याची दखल घेण्यात आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन याबाबतची खात्री केली.
सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले कुंभवडे येथे दिसून आलेला ब्लॅक पॅंथरचा व्हिडीओ खरा आहे. त्याबाबतची वन विभागाने खातरजमा केली आहे सिंधुदुर्ग मध्ये ब्लॅक पॅंथर चा अधिवास आहे. सह्याद्री पट्ट्यामध्ये बऱ्याच वेळा ब्लॅक पॅंथर दिसून आला आहे अशा प्रकारची नोंद वनविभागाकडे आहे. आंबोली तसेच तिलारी खोऱ्यामध्ये ब्लॅक पॅंथर आढळून आला होता परंतु या ब्लॅक पॅंथर ची एकूण संख्या किती आहे त्याबाबतची नोंद अजूनही वनविभागाने नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, सिंधुदुर्गात याआधी कुडाळ गोवेरी तेंडोली येथेही २०२१ मध्ये तेथील आंबा काजू बागेतील बांधलेल्या सिमेंटच्या टाकीत ब्लॅक पॅंथरचे दोन वर्षाचे पिल्लू आढळून आले होते. एकूणच मागील सर्व घडामोडींचा विचार करता सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात ब्लॅक पॅंथर असल्याचे बोलले जात आहे. एकूणच पट्टेरी वाघाच्या अधिवासाबरोबरच सिंधुदुर्गामध्ये ब्लॅक पॅंथरचा अधिवास आढळून येत असल्याने येथील जैवविविधतमध्येे मोठी भर पडली आहे.












