खेड(प्रतिनिधी)
खेड नगरप्रशासन एकीकडे कचरामुक्त शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम गतीमान करत असताना दुसरीकडे मात्र जगबुडी नदीकिनारी पुन्हा कचरा टाकत नगरप्रशासनाच्या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रकार नागरिकांकडून सुरू आहे. नजर चुकवून जगबुडी नदीकिनारी वाहनचालकांकडून कचरा टाकला जात आहे. यामुळे पुन्हा कचऱ्याचे ढीग जगबुडी नदीकिनारी निदर्शनास येत आहेत.
नगरपरिषदेच्या कचरा प्रकल्पाचे घोंगडे जागेअभावी भिजत पडले असले तरी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकीकडे नगरप्रशासन कचरामुक्त शहरासाठी झटत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र नगरप्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत सूचना फलक लावलेल्या ठिकाणीच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. जगबुडी टाकण्यास यापूर्वीच अटकाव करत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची तंबीही दिली होती. यानंतर नदीकिनारी कचरा टाकणे थांबले होते. मात्र आता पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहे. नजर चुकवत काही वाहनचालक जगबुडी नदीकिनारी कचरा फेकून पलायन करत आहेत. यामुळे नदीकिनारी पुन्हा कचऱ्याचे ढीग साचत आहेत. याचा त्रास जगबुडी नदीकिनारी अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. नजर चुकवून कचरा टाकणाऱ्यांवर नगरप्रशासन आता कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










