बांधकाम सभापतीपदी रणजीत तावडे, शिक्षण व आरोग्य – रोहन रावराणे, महिला व बालकल्याण – दर्शना पवार तसेच महिला व बालकल्याण उपसभापतीपदी संगीता चव्हाण यांची निवड
वैभववाडी l प्रतिनिधी :वाभवे – वैभववाडी नगरपंचायत बांधकाम सभापतीपदी भाजपाचे रणजीत तावडे, शिक्षण व आरोग्य सभापतीपदी रोहन रावराणे, महीला व बालकल्याण सभापतीपदी दर्शना पवार तर महीला व बालकल्याण उपसभापतीपदी संगिता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायत विषय समिती सभापती व महीला बालकल्याण उपसभापती पदांची निवडणुक नगरपंचायत सभागृहात पार पडली. निवडणुक पिठासन अधिकारी जगदीश कातकर यांनी सभापती निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी न.पं. मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते.
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विषय समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची एक हाती सत्ता आहे. 17 पैकी 15 नगरसेवक भाजपाचे आहेत. नूतन सभापती व उपसभापती यांचे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर व पदाधिकारी उपस्थित होते. रणजीत तावडे यांनी नुकताच उबाठा सेनेमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांना काही दिवसातच पदाची लॉटरी लागली आहे. नगरपंचायत मधील बांधकाम खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सभापती व उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. यावेळी शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरसेवक प्रदीप रावराणे, रोहित रावराणे, संताजी रावराणे, श्री गणेश मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते.












