सावंतवाडी । सचिन रेडकर : पोलीस खातं असो वा इतर जवान ‘वर्दीला डाग लागू नये’ असे म्हटले जाते. भ्रष्टाचारा संदर्भात हे विधान असले तरीही वर्दीतील जवान नेहमीच यासाठी प्रयत्न करतात. मात्र, जनतेची सुरक्षा करीत याच वर्दीवर लागलेले रक्ताचे डाग मात्र त्यांच्या कर्तव्यदक्षतेबाबत निश्चितचं अभिमानाची व कौतुकाची बाब ठरतात. ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद घेऊन जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असलेल्या पोलिसांकडून देखील अनेकदा असे अनुभव येतात व ‘खाकीतील माणुसकी ‘ चे प्रकर्षाने दर्शन होते.
असाच अनुभव आला तो मंगळवारी सावंतवाडी शहरात झालेल्या अपघातावेळी. सगळीकडे ३१ डिसेंबरची म्हणजेच सरत्या वर्षाला निरोप देण्याची व नवीन वर्षाचे स्वागत करण्याची ‘ धूम ‘सुरू होती. सावंतवाडी शहरात देखील ‘सावंतवाडी पर्यटन महोत्सवा ‘च्या माध्यमातून नववर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
याचवेळी शहरातील सालईवाडा परिसरात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी असल्याची बातमी पोलिसांच्या कानावर येऊन धडकली. क्षणाचाही विलंब न लावता तेथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर व ट्राफिक हवालदार आबा पिळणकर यांनी आपली दुचाकी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळी दोन युवक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एका युवकाच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमेतून रक्ताच्या धारा उसळत होत्या. काही केल्या रक्त थांब नव्हते. प्रवीण वालावलकर यांनी प्रथम बाजूच्या घरातून मोठा कपडा मागवून घेत त्याच्या डोक्याला बांधून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला.
रुग्णवाहिकेला प्राचारण करण्यात आले होते मात्र बराच वेळ झाला तरी रुग्णवाहिका येत नव्हती. रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही युवक मदतीची अपेक्षा करीत पडले होते. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात देणे गरजेचे होते.
मात्र, ती परिस्थितीच एवढी गंभीर होती की कोणीही त्यांना आपल्या वाहनात घालून रुग्णालयात नेण्यास पुढे धजावत नव्हता. अशावेळी कशाचाही विचार न करता प्रवीण वालावलकर यांनी आपली दुचाकी काढली व ट्राफिक हवालदार आबा पिळणकर यांना सोबत घेत रक्तबंबाळ झालेल्या त्या जखमी युवकाला अक्षरशः दुचाकीने रुग्णालयात घेऊन गेले. दुसऱ्या गंभीर जखमेला त्याच पद्धतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात प्रवीण वालावलकर व त्यांचे सहकारी आबा पिळणकर ज्यावेळी पोहोचले त्यावेळी दोघांच्याही वर्दी अक्षरशः रक्ताने माखल्या होत्या. मात्र, कोणताही विचार न करता त्यांनी दोन्ही गंभीर जखमींना प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यातील ओमकार पांढरे नामक युवकाची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्याला त्वरित गोवा बांबोळी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर त्वरीत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करीत त्याला गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.
अपघातातील दुसरा गंभीर जखमी युवक बाबुराव नाईक हा देखील अत्यवस्थ होत होता. त्याला वाचविण्यासाठी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. यावेळी प्रवीण वालावलकर व आबा दोघेही धावपळ करताना दिसत होते. एकीकडे त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच आपले कर्तव्य बजावत त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून तसेच वरिष्ठांना घटनेची माहिती देण्याचे काम देखील त्यांच्याकडून सुरू होते. रुग्णवाहिकेतून स्वतः स्ट्रेचर घेऊन जखमींना रुग्णवाहिकेत घालून पाठवून देण्यापर्यंत त्यांनी केलेली धावपळ खरोखरच ‘खाकी वर्दीतील माणुसकी ‘ आजही जिवंत असल्याचे उदाहरण देत होती.
केवळ एवढ्यावरच न थांबता तेथे उपस्थित झालेल्या जखमींच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम देखील या पोलीस बांधवांनी केले. यावेळी त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान मळगाव येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघात स्थळी त्यांनी स्वतःची पोलीस व्हॅन पाठवून जखमीला रुग्णालयात आणण्यात मदत केली. त्याच्यावरही उपचारासाठी पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठी मदत केली.
रात्री नऊ वाजता झालेल्या या अपघातानंतर रात्रीचे अकरा वाजले तरीही हे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली सेवा बजावताना थकत नव्हते. एकीकडे रुग्णालयालगतच असलेल्या मोती तलावाच्या बाजूला उद्यानात नववर्ष स्वागताची जोरदार धून सुरू होती तर दुसरीकडे अपघातग्रस्तांना वाचविण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी व्यस्त होते.
दुसरे तिसरे कोणीही असले असते तर रुग्णांना गोवा बांबूळी येथे पाठविण्यात आल्यानंतर घरी जाऊन रक्ताळलेले ते कपडे बदलून पुन्हा आले असते. मात्र, तशाच परिस्थितीत अपघात स्थळी जाऊन रस्त्यावर पडलेली अपघातातील ती दोन्ही वाहने टेम्पोतून पोलीस ठाण्यात हलविण्यात देखील प्रवीण वालावलकर व आबा पिळणकर यांनी अग्रेसर होते. रात्री १२ वाजेपर्यंत त्यांची ही सेवा अखंडितपणे सुरू होती व त्यानंतर देखील.
‘खाकीचा रुबाब ‘ तसेच वर्दीचा ‘खाक्या ‘ या गोष्टी अनेक वेळा बोलल्या जातात मात्र याच खाकीच्या आत असलेल्या माणसातील माणुसकी अशा काही प्रसंगांमधून आवर्जून निदर्शनास येते. कदाचित काही वेळा अपवादात्मक परिस्थितीत काही जणांकडून ‘वर्दीला डाग ‘ लागतही असेल मात्र समाजाची सेवा करत असताना अशा रुग्णांची अथवा मुख्यतः अपघात स्थळी मृत्यूच्या छायेत असलेल्या गंभीर जखमींना वाचविण्यासाठी पोलीस बांधवांनी दाखविलेली कार्यतत्परता ही नक्कीच गौरवास्पद आहे. त्यासाठी एक ‘सॅल्यूट ‘ नक्कीच बनतो व सहज मनात डोकावते की ‘कभी कभी कुछ दाग अच्छे भी होते है ।”











