देव, घैसास, कीर महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला

रत्नागिरी : वाचनाला कशाचेही बंधन असत नाही आणि पुस्तके नेहमीच अनुभूती आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि लेखक सचिन सनगरे यांनी केले.

 

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे औचित्य साधून भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात प्रा. सनगरे यांनी समाजावर साहित्याचा प्रभाव या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. सनगरे यांनी ‘वाचन आणि लेखन’ या विषयी बोलताना वाचनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. लहानपणी केलेले वाचन, विद्यार्थीदशेत केलेले आणि नंतर केलेले वाचन हळुहळू कसे आनंदी ठरत जाते ते सांगितले. म्हणजे वयानुसार वाचनाची गरज कशी बदलते ते सांगून मुखोद्गत ते मुद्रणकला येईपर्यंतचा लेखनाचा प्रवास सांगितला. वाचन गुरू म्हणजे वाचन कसे आणि कोणते करावे, हा मंत्र देणारी व्यक्ती भेटणे खूप महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य प्रा. वसुंधरा जाधव, ग्रंथालय समन्वयक सोनाली जोशी, ग्रंथपाल साईप्रसाद पवार व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.