शिरोडा येथे श्री देवी माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्या”चे आयोजन..

गावात चैतन्याचे वातावरण : ४ ते १२ मार्च पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

वेंगुर्ले | दाजी नाईक : श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या वतीने मंगळवार ४ मार्च ते बुधवार १२ मार्च या कालावधीत शिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिरा मध्ये “सहस्त्रचंडी अनुष्ठान – एक धार्मिक सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य दिव्य अशा सोहळ्यास आपण सर्वानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन श्री देवी कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सोमवार दि. ३ मार्च रोजी सायं. ४ वा. भव्य मिरवणुकीने आजगांव सीमा ते श्री देवी माऊली मंदिर पर्यंत श्री गणेश मूर्ती आगमन सोहळा असणार आहे. मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ८.०० वा. पासून धार्मिक कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पुणे येथील ह.भ.प. श्री हरिहर नातू बुवा यांचे सुश्राव्य किर्तन विषय – ऋषी नाभाग चरित्र आणि रात्रौ – ९.३० देवेंद्र नाईक चेंदवणकर नाट्य मंडळ, चेंदवण यांचा हलते देखावे व ट्रिकसिन युक्त पातिप्रत्यतेज – अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा हे नाटक होणार आहे.
बुधवार ५ मार्च रोजी धार्मिक कार्यक्रम, सकाळी ९ ते दुपारी १२.३० कुंकुमार्चन, श्री देवी माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक (विशेष पंचामृतादि अभिषेक) आरती, तीर्थप्रसाद. त्यानंतर ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ, आरवली पंचक्रोशी यांचा पं. अजितकुमार कडकडे यांनी स्वरबद्ध केलेली भक्तीगीते सायंकाळी ५.०० ते ८ यावेळेत सादर होणार. ‘स्वराजित’ गायक : श्री श्रीराम दीक्षित, रविंद्र पणशीकार आणि सहकारी सहभागी होणार. तर रात्रौ ९.३० वाजता वालावलकर दशावतारी नाटक मंडळ प्रस्तूत “कष्ट मंजन मारुती” हे दशावतारी नाटक सादर होणार. गुरुवार दि.६ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, दु.२.३० ते सायं. ५.०० सत्यअंबा पूजा, सायंकाळी पूजा आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ५ वाजता “भीममाया अर्थात दुर्गा द्रौपदी” या विषयावर पुणे येथील ह.भ.प. श्री. संदिप मांडके बुवा यांचे सुश्राव्य किर्तन होणार तर – रात्रौ ९.३० वाजता हरवल्ली प्रॉडक्शन आरवली निर्मित, वसंत सबनीस लिखित दोन अंकी धमाल विनोदी नाटक “सौजन्याची ऐशी तौशी” सादर होणार आहे.

 

शुक्रवार दि.७ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, ९ ते दुपारी १२.३० कुंकुमार्चन, आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ६ वाजता दुर्गा नमस्कार पूजा आणि रात्री ९.३० वाजता अक्षता सावंत, स्वप्नील गोडबोले, संजोनी जगदाळे, अनुष्का शिंगतोडे यांच्या आवाजात “बेधुंद हिंदी मराठी सिने गीतांचा अनोखा नजराणा” कार्यक्रम सादर होणार. शनिवार दि.८ मार्च रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, ९ ते दुपारी १२.३० कुंकुमार्चन, आरती, तीर्थप्रसाद.सायंकाळी ५ वाजता ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ, आरवली पंचक्रोशी यांचे श्री.ग.दि. माडगुळकर आणि श्री सुधीर फडके यांची अजरामर संगीतमय निर्मिती कार्यक्रम सादर होणार. यात निवडक गीतरामायण गायक : श्री शेखर पणशीकर, श्री अरुण मराठे, सौ. मान्यता कुटे व सहकारी असणार आहेत. तर रात्रौ – ९.३० वाजता भजन सम्राट बुवा – श्री भगवान लोकरे व भजन सम्राट बुवा श्री. श्रीधर मुणगेकर यांचा “पारंपारीक डबलबारी भजनाचा” सामना रंगणार आहे.
रविवार दि.९ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम,आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ६ वाजता अष्टावधान सेवा कार्यक्रम आणि रात्रौ ९.३० वाजता ऑकेस्ट्रा – सरगम म्युझिकल नाईट सादर होणार आहे.
सोमवार दि. १० मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, श्री देवी माऊलीची विशेष गंधपूजा, अग्रिअर्चन सप्तशतीपाठ हवन, कुमारीका पूजन, सुवासिनी पूजन, लघुपूर्णादूती, आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ५ वाजता कु. निधी जोशी यांचे नाट्यगीत गायन आणि त्यानंतर ह.भ.प. कु. नेहा उपाध्ये, गोवा यांचे सुश्राव्य किर्तन विषय : कृष्ण सुदामा भेट तर रात्रौ ९.३० वाजता “मिक्स अभंग – री पोस्ट भक्ती गीताचा अनोखा संगम” हा कार्यक्रम सादर होणार आहे. श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ, कोल्हापूर यांची उपस्थिती
मंगळवार दि.११ मार्च रोजी धार्मिक कार्यक्रम, सकाळी १०.०० वा. श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ, कोल्हापूर यांची उपस्थिती लाभणार असून यावेळी दर्शन सोहळा होणार आहे. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद होणार.सायंकाळी ५ वाजता “धर्मवीर संभाजीराजे” या विषयावर पुणे येथील राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. श्री चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य किर्तन आणि रात्रौ ९.३० वाजता सिंधुसंकल्प एटरटेंनमेंट प्रा. लि. निर्मित “अयोध्या” हे महानाट्य सादर होणार आहे. कार्यक्रम स्थळी दररोज रात्री ८ वा. महाआरती होणार आहे.
दरम्यान बुधवार दि. १२ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सामुदायिक गाऱ्हाण महाआरती, आशिर्वाद ग्रहण, दुपारी महाप्रसाद असणार आहे. आणि सायंकाळी पार्थिव गणपती मूर्ती विसर्जनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.