राजापूरात प्रतिष्ठान आयोजित पालखी महोत्सव
संतोष मोंडे, राजापूर: तालुक्यात सर्वत्र शिमगोत्सवाची धामधुम सुरू असताना रविवारी येथील यशोदिन सृष्टी पाटीलमळा येथे राजापूर प्रतिष्ठान आयोजित अनोख्या पालखी महोत्सवात गावोगावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या आणि खेळयांनी सादर केलेल्या पारंपारिक खेळे आणि पालखीनृत्याच्या अभूतपुर्व अविष्काराने राजापूरकरांच्या डोळयाचे पारणे फेडले. जोय जतारी.. जोय जता! याचा एकच एकच हुंकार यानिमित्ताने घुमल्याचे पाहायला मिळाले.

काळाच्या प्रवाहात कालबाह्य होवू पाहणाऱ्या सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, समाजात त्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
या महोत्सवाचे उद्घाटन प. पु. गगनगिरी आश्रम कोंडीवळेचे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज, प. पू. संजयसिंह पाटणकर, ह. भ. प. विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते श्री गणेशपूजन, दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहन पाडावे, सल्लागार रविंद्र नागरेकर, सौ. दिपाली पंडीत व मंडळाचे पदाधिकारी उपस्थीत होते.
ढोलताशा, वाजंत्रीच्या वाद्यात मिरवणुकीने विविध पालख्यांचे नियोजित वेळी महोत्सव स्थळी आगमन झाले. यावेळी राजापूर प्रतिष्ठानतर्फे उस्तफुर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक गावच्या मेळाने एका मागोमाग एक असे पारंपारिक खेळे, पालखीनृत्य व ढोलवादनाचे सादरीकरण केले.
यामध्ये सर्वप्रथम उन्हाळे गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी पालखीचे आगमन झाले. अत्यंत शिस्तबध्द रितीने फेर धरत तालासुरात त्यांनी आपल्या पारंपारिक खेळयांचे सादरीकरण केले. डफाच्या तालावर लयबध्द पदन्यास करीत उपस्थीत रसिकांना आनंद मिळवून दिला. त्याचबरोबर पौराणिक कथांवर आधारीत कवने सादर करीत रसिकाना रिझवले. पारंपारिक कारली आणि त्यानंतर सुख समृध्दीचे गाऱ्हाणे घालत संयोजकाना आशिर्वाद दिला. मोठया संख्येनी मंडळी यामध्ये सहभागी झाली होती.
त्यानंतर कोंढेतड गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो, पंचग्रामदेवता गोठणे दोनिवडे, दुर्गादेवी पाथर्डे, श्री नवलादेवी शेढे, श्री ब्राम्हणदेव पावणादेवी शीळ बाईतवाडी यांनी सकाळच्या सत्रात आपले पारंपारिक खेळे सादर करीत रसिकांचे रंजन केले. शेढे नवलादेवीच्या नृत्य आणि ढोलवादनाने रसिकांना खिळवून ठेवले.
दुपारच्या सत्रात माता पूर्वादेवी हातणकरवाडी आणि शीळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी पालख्यांचे महोत्सव स्थळी आगमन झाले. त्यानी डफाच्या तालावर फेर धरत पारंपारिक नृत्य सादर केले. पौराणिक कथांवर आधारीत गीतातून रसिकाना ठेका धरयला लावले. शीळच्या पालखीने वैशिष्टयपुर्ण पालखीनृत्य सादर करत उपस्थीतांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तेरवण बाईंगवाडी च्या पारंपारिक वेषातील निशाण खेळयांनी आपल्या पारंपारिक लोककलेचे सादरीकरण केले. पारंपारिक वेषातील लयबध्द गीत आणि पदन्यासांनी त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले.
सायंकाळच्या सत्रात बाकाळे, कोंढेतड धोपटेवाडी, पवार मंडळ दिवटेवाडी राजापूर यांनी पारंपारिक गोमूचा नाच सादर केला. पेटीच्या साथीने वल्हा हातात घेत सादर केलेल्या वेगळया बाजाच्या कोळीनृत्याने ररिकांना खिळवून ठेवले. या गीत नृत्यातून कोकणातील पारंपारिक शिमगोत्सवाचे आगळे वेगळे दर्शन घडले.
एकापाठोपाठ एक आलेल्या पालख्यांनी एक धार्मिक वातावरण दिवसभर पाटीलमळा येथे पाहायला मिळाले. पारंपारिक खेळे पाहण्यासाठी रसिकांनीही मोठी गर्दी केली होती. महोत्सवात सहभागी झालेल्या विविध गावच्या ग्रामदैवतांचा राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्क्म व स्मृतीचिन्ह देवून आदर सत्कार करण्यात आला.
या सोहळयाला दिवसभरात विविध क्षेत्रातील मंडळीनी भेट देत आयोजकांचे भरभरून कौतुक केले. यावेळी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, माजी आमदार गणपत कदम व अन्य मान्यवरांनी राजापूर प्रतिष्ठानने राबविलेल्या या आगळया उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा प्रकारच्या उपक्रमातून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा मंडळाचा उपक्रम स्तुत्य असून अशाप्रकारचे उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमुद केले. तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यानी अशा प्रकारच्या उपक्रमातून जे जे पिढयान पिढया या शिमगोत्सवाच्या परंपरा जपत आले आहेत अशा कलावंताना राजाश्रम मिळाला हवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तर आलेल्या सर्व देवतांच्या पालख्यांचे यजमानांकडून ओटी भरून यथोचित सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मोहन पाडावे यांच्यासह कार्याध्यक्ष प्रकाश कातकर, सचिव राजू कार्शिंगकर, खजिनदार गोपाळ गोंडाळ तसे नंदकुमार पुजारे, अशफाक मापारी, सुधीर विचारे, सुभाष नवाळे, प्रकाश पुजारे, राजू जोगळे, अक्षय कशेळकर, दिलीप नलावडे, दिनेश चौगुले, रमेश चव्हाण, संतोष तांबे, पांडुरंग सोडये, रमेश पाडावे, संतोष हातणकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.











