भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
स्वप्निल कदम- भुईबावडा | तळ कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव म्हणून ख्याती असणारा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील शिमगो उत्सवाची सांगता शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सरत्या खेळाने होणार आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावचा होळीपासून सुरू झालेला हा शिमगा उत्सव सरता खेळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लळीताचे अनोखे प्रकार या ठिकाणी भक्त भाविकांना पहावयास मिळतात. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित असतात. पालखी मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालात न्हाहून जाणारी रात्र खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडणारी असते. शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळपासून देवाचा कौल झाल्यानंतर मानकरांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या ओटी भरणे कार्यक्रम सुरू होतो. दिवसभर ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी यावेळी पहावयास मिळते. शनिवार दिनांक 29 रोजी सायंकाळी होळीच्या मांडा च्या परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावातील मानकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने जत्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून येणाऱ्या भक्त भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. 29 रोजी होणाऱ्या सरत्या खेळाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









