सावंतवाडी:
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोंदा आणि आंबोली परिसरात पोलिसांनी रविवारी सकाळी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गोवा बनावटीच्या मद्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
पहिली कारवाई आंबोली बस स्थानक येथे सकाळी १० च्या सुमारास करण्यात आली. कोल्हापूर येथील तौसिफ ताजुद्दीन सौदागर (३९, रा. मंगळवार पेठ) हा एसटी बसमधून प्रवास करत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीत १२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची व्होडका मिळून आली. बेकायदेशीर मद्य वाहतूक प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पोलीस हवालदार संतोष गलोले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसरी कारवाई आरोंदा देऊळवाडी येथे करण्यात आली. या ठिकाणी मागदेलीन अगस्तीन फर्नांडिस (६४, रा. आरोंदा) हा १८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगून असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अरवारी करत आहेत.









