Breaking : चाफे येथे भीषण अपघात; भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले

दुचाकी गाडीला अडलेल्या अवस्थेत पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला गाठून संतप्त जमावाने टेम्पो पेटवला

खंडाळा | वार्ताहर 

तालुक्यातील चाफे येथील पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर आयशर टेम्पोने दुचाकी जोरदार धडक देऊन भीषण अपघात केला. यात दुचाकीस्वर जागीच ठार झाला तर टेम्पोने दुचाकी १ किमी फरफटत आणली. या अपघाताने संतप्त झालेल्या जमावाने टेम्पो पेटवून दिल्याचे वृत्त आहे. ही घटना सकाळी ११ वाजत घडली असून जयगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खंडाळा चाफेरी येथिल किरण पागडे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या ओपनी गाडीच्या कामासाठी मांजरे फाटा येथे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी चाफे पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर अचानक आलेल्या वेगवान असलेल्या आयशर टेम्पोची त्यांची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होते ही किरण पागडे दुचाकीसह टेम्पोच्या खाली गेले आणि मागचे चाक त्यांच्या डोक्यावरचे गेले. त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

संतापजनक बाब म्हणजे हा अपघात झाल्यानंतर आयशर टेम्पो चालकाने घटनस्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली दुचाकी अडकलेल्या अवस्थेत असतानाही चालकाने टेम्पो तसंच पुढे १ किमी पर्यंत नेला. मात्र टेम्पो चालक पलायन करत असल्याचे लक्षात येताच तेथील संतप्त ग्रामस्थांनी टेम्पोच पाठलाग करून तो थांबवला आणि त्यानंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिल्याचे वृत्त आहे.

यात दुर्दैवी दुचाकी चालक किरण पागडे यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या मित्र परिवाराने घटनास्थळी गर्दी केली होती. तर टेम्पो पेटवल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने जयगडचे API श्री. पाटील त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.