हत्ती पकड मोहिमेबाबत वनमंत्री सकारात्मक; मंत्रालयात बैठकीत घेतला आढावा

दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात रानटी हत्ती उपद्रव आहे यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी जेवढा खर्च अपेक्षित आहे तो शासन देईल असे वनमंत्री यांनी आश्वस्त करीत वनविभागाने याचा परिपूर्ण प्रस्ताव करावा असे आदेश दिले असल्याची माहिती स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिली मंत्रालयात गुरुवारी याबाबत बैठक झाली यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार दिपक केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी प्रतिनिधी दत्ताराम देसाई यांसह दत्तगुरू मयेकर, अँड. अनिल दळवी, राजन मोर्ये आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वनमंत्री यांनी, कर्नाटक मध्ये जी हत्ती पकड मोहीम झाली त्याची इत्यभूत माहिती घ्यावी. तिलारीत हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी कुशल मनुष्यबळ ते छोट्या मोठया बाबीवर जो खर्च येईल याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे आदेश वनअधिकाऱ्याना दिले. वनमंत्री, आमदार यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आता संघटना म्हणून आमची जबाबदारी पाठपुरावा करण्याची आहे त्यात सातत्य ठेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ असे स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले.