दोडामार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग पोलीस स्टेशन मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गुंडू सुतार यांचे गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आज सकाळी ते ड्युटीवर आले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना म्हापसा किंवा बांबोळी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांना म्हापसा रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

 

पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक सुतार हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दीपक सुतार यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी दोडामार्ग येथे दाखल झाले होते. दोडामार्ग पोलीस कर्मचारी समीर सुतार यांचे ते भावोजी होत.