खेडमध्ये नवीन पाणी योजनेच्या कामामुळे फुटताहेत जलवाहिन्या, कमी दाबाने पाणीपुरवठा

खेड(प्रतिनिधी) शहरात ४३ कोटी रुपये खर्चुन नव्याने राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी नळपाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नव्या नळपाणी योजनेच्या खोदाईमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असतानाच जुन्या जलवाहिनीलाही फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. जागोजागी फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने नव्या नळपाणी योजनेसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात नव्या नळपाणी योजनेचे काम देखील गेल्या चार महिन्यांपासून वेगाने सुरू झाले आहे. यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र या याजनेच्या कामामुळे एका नव्या समस्येने डोके वर काढले आहे.

सद्यस्थितीत नव्या पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्यांची खोदाई केली जात आहे. खोदाईनंतर मार्ग सुस्थितीत न आणता तसाच ठेवला जात असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या पाठोपाठ नवीन जलवाहिनीच्या खोदकामाचा जुन्या जलवाहिनीलाही फटका बसत आहे. यामुळे जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असल्याने कमी दाबाच्या पाणी समस्येने डोके वर काढले आहे. आधीच कमी दाबाची पाणी समस्या उद्भवलेली असतानाच त्यात फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रसंगी खासगी टँकरद्वारे विकतचे पाणी आणून तहान शमवावी लागत आहे.

याबाबत नगर प्रशासनाकडे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.