माहिती अधिकारात बाब उघड, रस्ता नाही मग जागा खरेदी कशी केली? कोत्रेवाडी ग्रामस्थांचा सवाल
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायती मार्फत कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत सार्वजनिक रस्ता नसल्याची बाब, माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे रस्ता नसताना डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची खरेदी कशी केली? असा सवाल कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच रस्ता नसतानाही रस्ता आहे असे दाखवून जमीन मालकांनी नगरपंचायत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.
लांजा नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प(घनकचरा प्रकल्प )प्रस्तावित आहे. मात्र तो लोकवस्ती पासून जवळ असल्याने त्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. चार वर्षांपासून ग्रामस्थांचा या विरोधात लढा सुरू आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, मुळातच या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाकडे(घनकचरा प्रकल्प ) जाण्यासाठी शासनाचा अधिकृत व सार्वजनिक रस्ता असणे हे बाब महत्त्वाची आहे .तसा तशी अट नगर पंचायतीकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्ये नमूद केलेली आहे. मात्र असे असतानाही डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासाठी (घनकचरा प्रकल्प ) ज्या जागेची खरेदी करत आहोत त्याकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत सार्वजनिक रस्ता आहे की नाही याची खातरजमा न करताच या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून नगरपंचायतीने खरेदीखत केले आहे. कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोह़ोचमार्ग नियोजित जागेला नसताना प्रस्ताव स्वीकारण्याचे कारण काय? या मागचे नेमके गौडबंगाल काय आहे? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
डंपिंग ग्राऊंडच्या जागेची खरेदी करताना रस्त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा यांचेकडील दाखला जोडलेला आहे. सदर दाखल्यात नमूद केल्या प्रमाणे ग्रामीण मार्ग १७१ हा रस्ता जि.प्र.मा.६३ म्हणजे जावडे रोड मार्गाच्या विरूद्ध दिशेला फुटून ४०० मिटर इतकाच आहे. त्यामुळे खरेदीखताला जि.प.बांधकामचा दाखला जोडून खरेदीखत करणार्या संबंधितांनी शासनाची दिशाभूल केली आहे.
नियोजित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाकडे जाणारा सार्वजनिक रस्ता नसल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा व नगरपंचायत लांजा यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार यापूर्वी स्पष्ट झाले आहे. असे असताना मग नगरपंचायतीने जागेचे खरेदीखत केलेच कसे? व प्रकल्प येथेच करण्यावर नगरपंचायत का अडून का बसली आहे ? त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नावरून नगर नगरपंचायत अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व चुकीच्या बाबींकडे दुर्लक्ष करून शासनाने जोर जबरदस्तीने डंपिंग ग्राऊंड प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात तीव्र जन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा कोत्रेवाडी
ग्रामस्थांनी दिला आहे.










