कठोर कारवाई करण्यासाठी राजापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर
राजापूर (प्रतिनिधी): जम्मू कश्मिर पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा राजापुरातील मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करत याबाबतचे एक निवेदन जमातुल मुस्लीमीन राजापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना अग्रेसित करून राजापूर तहसीलदार व राजापूर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
आम्ही राजापूरमधील जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे अत्यत दुःख वेदनेने हे पत्र सादर करीत आहोत. जम्मू-कश्मीरच्या पहलगाम भागात घडलेला निघृण आणि अमानवी हल्ला संपूर्ण मानव जातीच्या अंतःकरणाला हादरवून गेला आहे.
या घटनेत निरपराध व निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले, जे केवळ कायद्याचे, संविधानाचे आणि मानवी मूल्यांचे उल्लंघन नाही, तर देशाच्या सामूहिक अंतरात्मा, ऐक्य, न्याय व शांततेच्या मूल्यांवर थेट आघात आहे असे नमुद करत या घटनेची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्च स्तरीय चौकशी करून अतिरेक्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा.अतिरेक्यांवर कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, जेणेकरून अशा कृत्यांची पुनरावृत्ती करण्याचा विचार, कोणीही करू शकणार नाही. हल्ल्यातील पीडित कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत, मानसिक आधार व संपूर्ण संरक्षण देण्यात यावे, जेणेकरून त्यांना या दुर्घटनेतून सावरता येईल. सरकार, पोलीस व तपास यंत्रणांनी या घटनेशी संबंधित माहिती वेळोवेळी जनतेला कळवावी, जेणेकरून अफवांना आळा बसेल
आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितों की, संपूर्ण देश आणि विशेषतः भारतीय मुस्लिम समाज अशा कोणत्याही दहशतवादी व आतंकवादी कृत्याचा स्पष्ट व ठाम निषेध करीत आहे. पवित्र कुरआनच्या वचनानुसार “ज्याने एखाद्या निष्पाप जीवाचा नाहक बळी घेतला, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचा बळी घेतला आणि ज्याने एखाद्याचे प्राण वाचवले, त्याने जणू संपूर्ण मानव जातीचे प्राण वाचवले” आमचा समाज आणि समुदाय अशा प्रत्येक अन्याय, अत्याचार आणि दहशतीविरुद्ध उभा आहे. असे नमुद करत या हल्ल्याचा तीव्र निषेध करत समाजाच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.
आपल्या उत्तराची अपेक्षा आहे.
राजापूर तहसीलदार विकास गंबरे व पोलीस निरीक्षक अमित यादव यांना हे निवेदन देयणत आले. याप्रसंगी मौलाना लुकमान सपनाके, जमातुल मुस्लीमीनचे अध्यक्ष व राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, गफूर मुल्ला,आजिम जैतापकर, आदील चौगुले, इम्रान वाघु, शहबाज खलिफे, अन्वर खोपेकर, आजिम मुल्ला, साकिब मुंगी, वसीम दसूरकर आदींसह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.












