Accident due to stalled work on Mumbai Goa highway
राजापूर | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात होवून राजापूर कुणबी पतपेढीच्या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. सानिका पुजारी व संदीप पुजारी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी कोदवली येथील हॉटेल गुरूमाऊली समोर हा अपघात घडला.
राजापूर शहरालगतच्या हर्डी येथील रहिवासी संदीप पुजारी हे मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नी व कुणबी पतपेढीच्या कर्मचारी सानिका पुजारी यांना कुणबी पतपेढीच्या ओणी शाखेत सोडण्यासाठी चारचाकीने जात होते. ह्यातले गुरूमाऊलीसमोर आले असता समोरून वेगात येणार ट्रक अचानक समोर डायव्हर्जन आल्याने गाडी दुसऱया बाजुला घेत असताना पलटी झाला. पलटी होताना ट्रक पुजारी यांच्या गाडीच्या दिशेने येवू लागल्याने त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा पयत्न केला असता गाडी लगतच्या कठड्यावर आदळली. याच दरम्यान पलटी झालेल्या ट्रकचा काही भागही चारचाकीवर कोसळला.
या अपघातामध्ये सानिका पुजारी यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली तर संदीप पुजारी किरकोळ जखमी झाले. दोघांनाही राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सौ.पुजारी यांच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग येथे हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच कुणबी पतपेढीचे चेअरमन पकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांच्यासह कर्मचारी तसेच हर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामीण रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली.












