कादिवली येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली १४ वर्ष रखडलेला प्रकल्प मार्गी

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश

दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील कादिवली येथे जलसंधारण विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आज राज्यमंत्री मा. योगेश रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले.

एकूण 13 कोटी 44 लाख 3 हजार 497 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील 160 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, धरणाची उंची 32 मीटर आणि पाणलोट क्षेत्र 1.25 चौ. कि.मी. इतके आहे. लवकरच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या प्रकल्पाला 2011 साली प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र त्यावेळी काही कारणास्तव स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता. त्यांच्या त्या आक्षेपांचा योग्य विचार करून मंत्री योगेश कदम यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन धरणाच्या जागेचा फेरविचार करून नवीन जागेवर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध मागे घेतला गेला आणि सर्वपक्षीय सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली.

“हा प्रकल्प म्हणजे केवळ पाणीपुरवठ्याचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा उपक्रम आहे,” असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास जलसंधारण विभागाचे अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे मनापासून आभार मानले. “आपल्या सहकार्यामुळेच आज हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे,” असं देखील ते यावेळी म्हणाले.