RATNAGIRI: भाजपा महिला प्रदेश सचिवपदी शिल्पा मराठे यांची नियुक्ती

Appointment of Shilpa Marathe as BJP Women State Secretary

रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या सौ. शिल्पाताई धनंजय मराठे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली. या निवडीने रत्नागिरीला प्रदेशात मोठी संधी मिळाली आहे.

प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गातील प्रज्ञा ढवण आणि सचिवपदी प्रिया शर्मा (कल्याण) आणि शिल्पा मराठे (रत्नागिरी) यांच्या नावांची घोषणा केली. उर्वरित नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करू असेही सांगितले आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी हार्दिक अभिनंदनही केले.

दक्षिण रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस शिल्पाताई मराठे या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत. त्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली असून पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन सचिवपदी निवड करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती झोपडपट्टी व सर्व मतदारांना देण्याकरिता त्यांनी प्रभागांमध्ये काम केले आहे. हळदीकुंकू समारंभातून प्रभागातील सर्व महिला कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण, कोरोना काळातून वाचलेल्या रुग्णाचे स्वागत, राम मंदिर भूमीपूजनानिमित्त जल्लोष कार्यक्रमांचे आयोजन शिल्पाताईंनी आपापल्या प्रभागांत केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने त्यांनी शिक्षिकांचा सन्मानही केला.

ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने राज्यभरात केलेल्या आंदोलनातही शिल्पाताईंनी भाग घेतला होता. रत्नागिरी शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्यामुळे भाजपाने स्वतः श्रमदान करून खड्डे भरले होते. त्यावेळीही शिल्पा मराठे यांनी भाग घेतला. आशा सेविकांवर राज्यातील मागील मविआ सरकारने अन्याय केला होता. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा सौ. शिल्पा मराठे यांनी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता. रत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या अर्धवट कामाविरोधात भाजपाने केलेल्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. त्यांच्या या सक्रिय सहभागी नोंद घेत आता सचिव पदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी व राजापूरमधील भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.