मोती तलावाच्या प्रदूषण प्रश्नी संजू परब आक्रमक

मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत ड्रेनेजचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी 

पालिका प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक महत्व असलेल्या मोती तलावाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या पाश्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेऊन मोती तलावातील ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांत हा प्रकार बंद न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशाराही परब यांनी यावेळी दिला.

शहरातील मोजक्या चार इमारतींमधून ड्रेनेजचे पाणी थेट मोती तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरत आहे, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. ‘मोती तलाव’ हे शहराचे सौंदर्य आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलेले आम्ही कधीच खपवून घेणार नाही,’ असे परब यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्यासमोर ठणकावून सांगितले.

दरम्यान, शहरातील आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देणाऱ्या अधिकारी वर्गाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही परब यांनी केला.

यावेळी परब यांच्यासोबत विनोद सावंत, सुधा कवठणकर, महेश पांचाळ, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

मोती तलावातील प्रदूषणासोबतच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशाही त्यांनी मुख्याधिकारींच्या निदर्शनास आणली. शहरातील स्वच्छतागृहेही स्वच्छ आणि नीटनेटकी असावीत, अशी मागणी त्यांनी केली.

यावर मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी संबंधित इमारतींना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता त्या इमारतींमधील रहिवाशांची तातडीची बैठक घेऊन त्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ट्रीटमेंट प्लॅन) सुरू करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. रहिवाशांनी या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाहीही मुख्याधिकारी पाटील यांनी दिली. त्या स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संजू परब यांनी दिलेल्या आठ दिवसांच्या अल्टिमेटममुळे मोती तलावाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालिका प्रशासन यावर काय उपाययोजना करते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.