सलग दुसऱ्या वर्षी चतुरंगच्या निवासी आणि निर्धार निवासी वर्गांचा निकाल १०० टक्के

चिपळूण (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या चतुरंगच्या इयत्ता १० वी च्या निवासी आणि निर्धार निवासी अभ्यासवर्गांचा निकाल हा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक हुशार विद्यार्थ्यांसाठी चतुरंगद्वारा दिवाळी सुट्टीत वहाळ येथे निवासी वर्गांचे आयोजन केले जाते तर अभ्यासात मागे पडलेल्या कच्च्या /प्रमोटेड मुलांसाठी वर्षातून तीनवेळा निर्धार निवासी वर्ग वहाळ येथेच चतुरंग द्वारा योजिला जातो. यावर्षी या निर्धार निवासी वर्गाच्या ४० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली असून ५ विद्यार्थ्यांना ७० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. हुशार विद्यार्थ्यांच्या निवासी वर्गात ३ विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता सर्वच विद्यार्थी ८५ ते ९९ टक्के गुण मिळवून पास झाले आहेत.

 

 

निवासी वर्गात एकूण ५४ विद्यार्थी होते. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुक करणारा गुणवंत विद्यार्थी सोहळा आणि सोबतच दिली जाणारी स्व. प्रतिभा मोने व स्व. काणे मामा स्मृतिप्रित्यर्थ चतुरंग शिष्यवृत्ती प्रदान सोहळा रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात योजिला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत, तर या प्रसंगी निवासी वर्गातील सर्वांचे आवडते प्रा. दीपक मराठे सर मुद्दाम हजर राहणार आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चतुरंगच्या वर्गातूनच पुढे गेलेले आणि MPSC परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवून आज मंत्रालयात ‘सहाय्यक नगररचनाकार’ या अभिमानास्पद पदावर कार्यरत असणारे रोहन साळुंके हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर अनुभव कथन करणार आहेत. चिपळूणमधील शिक्षणप्रेमी मंडळींनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहावे असे चतुरंगच्या परिपत्रकात म्हटले आहे.