पहिलीच ४० हजार विटांची भट्टी लावण्याचा पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते केला शुभारंभ
संतोष कुळे lचिपळूण : तालुका आदिवासी आदिम रोजगार व सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने चिंचघरी येथे वीटभट्टी प्रकल्प सुरू करण्यात आला. गेल्या वीस दिवसांमध्ये आठ कामगारांनी सुमारे ४० हजारापेक्षा जास्त विटा तयार केल्या. मंगळवार दिनांक ११ रोजी सायंकाळी पहिली वीट भट्टी पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते लावण्यात आली.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळच्या माध्यमातून चिपळूण तालुका आदिवासी आदिम रोजगार व सेवा सहकारी संस्थेने समाजातील स्थानिक कामगारांना काम मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील चिंचघरी येथे प्रथम वीटभट्टी प्रकल्प सुरू केला. या ठिकाणी विटा बनवण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा कामगारांना संस्थेने उपलब्ध त्यांनी करून दिल्या. कातकरी समाजातील काही तरुणांनी मिळून वीट भट्टीचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले आहे. आपल्या स्थलांतरित जीवनाला कुठेतरी स्थिरता मिळावी आणि रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये येथील आठ कामगारांनी सुमारे ४० हजार पेक्षा जास्त विटा तयार केल्या आहेत. या सर्व विटा भट्टीत भाजून काढण्याची तयारी सुद्धा करण्यात आली. एका वर एक असे थर रचून खाली आग लावण्यासाठी नऊ दरवाजे ठेवण्यात आले होते. पहिल्या विटांना भट्टी देण्यासाठी मंगळवार ११ रोजी संध्याकाळी ५ वाजता पहिली वीट भट्टी लावण्यात आली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कुळे यांच्या हस्ते वीट भट्टी लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नंदिवसे गावचे तलाठी रफिक शेख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव सचिव सुरेश मोहिते आणि कामगार यांनी पहिली वीटभट्टी लागल्याने समाधान व्यक्त केले आहे. निश्चितच पुढे संस्था वीट भट्टी प्रकल्पात आपलं नावलौकिक करेल असा विश्वास सुद्धा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. कातकरी समाजातील युवकांनी धाडशी पाऊल टाकले आहे. त्यांना आता या व्यवसायात मोठे करण्यासाठी इतरांनी सहकार्य करण्याची गरज आहे.












