नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अद्वितीय कार्य
खेड (प्रतिनिधी)शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी खंडित झाल्याने खेडवासीयांवर २५ रोजी जलसंकट कोसळले होते. पुढील तीन ते चार दिवस शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचा इशारा नगर प्रशासनाने तातडीने दिला होता. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले होते आणि कुठलेही काम सुरळीत पार पाडणे जवळजवळ अशक्यप्राय झाले होते. त्यामुळे खेडवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अशा प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थितीतही खेड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अक्षय लोहार, प्रणिल जाधव, राजेश खेडेकर, आणि उमेश रेपाळ या कर्मचाऱ्यांनी खडतर प्रसंगी अतुलनीय धैर्य आणि समर्पण दाखवले. जगबुडी पुलाखाली जोरदार पुराच्या पाण्यात, रोपच्या सहाय्याने त्यांनी पाईपलाइनचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरवासीयांना अखंडित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळू शकला.
या बहाद्दर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी प्रमोद ठसाळे, प्रणव सस्ते, हृदय आग्रे यांच्यासह खेड येथील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती कुंदन सातपुते, डॉ. विक्रांत पाटील, तसेच उत्तमकुमार जैन यांनी जलपुरवठा विभागाचे आभार मानले.









