लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या उपक्रमाला दिले सक्रिय पाठबळ
खेड │ १३ जुलै २०२५
कोकणात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वर्षा मॅरेथॉन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार योगेश कदम यांनी आज सकाळी प्रत्यक्ष धाव घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
“रन फॉर हेल्थ” या संदेशासोबत खेडमधील मुकादम लँडमार्क येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. १००० हून अधिक स्पर्धक या उपक्रमात सहभागी झाले होते. मंत्री योगेश कदम यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करत आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. चार वेगवेगळ्या गटांमध्ये झालेल्या या मॅरेथॉनमध्ये पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवरांसाठी खास गट ठेवण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान वैद्यकीय सुविधा, पाण्याचे स्टॉल्स, एनर्जी ड्रिंक्स यांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमात मंत्री कदम यांनी स्वतः धावून सहभाग घेतल्याने सर्व स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांनी मॅरेथॉन संपल्यानंतर उपस्थित आयोजक व सहभागींचे कौतुक करत लायन्स क्लबच्या कार्याची प्रशंसा केली. या वेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, प्रोजेक्ट चेअरमन हनीफ घनसार, प्रमुख प्रायोजक शमशुद्दीन मुकादम, प्रवीण पवार, अविनाश दळवी, माणिक लोहार व इतर पदाधिकारी तसेच क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मॅरेथॉन आरोग्य जपण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार असून पुढील वर्षांमध्येही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्यात येईल, असे संकेत आयोजकांनी दिले.









