राजापूर Update : कोंड्ये घरफोडीत ४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लांबविला

राजापूरात कोंड्ये येथे एकाच रात्रीत चोरटयांनी पाच बंद घरे फोडली

सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण ४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लांबविला

चोरीचा छडा लावण्याचे पोलीसांपुढे आव्हान 

राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात पुन्हा एकदा चोरटयांनी डोंकं वर काढले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीत सह अन्य दोन वाड्यांत अज्ञात चोरट्यानी एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडुन सोन्या चादींच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा एकूण ४ लाख ४३ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. मंगळवारी ९ जुन रोजी मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला आहे. महामार्गावर घडलेल्या या चोरीने एकच खळबळ उडाली असून या चोरीच्या तपासाचे आव्हान आता राजापूर पोलीसांना पेलावे लागणार आहे.

 या पाच पैकी अशोक महाडेश्वर यांच्या घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला असून ॲड. मुरलीधर मोरे यांच्या घरातील सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर उर्वरीत तीन घरांमध्ये चोरटयांच्या हाती काहीच लागलेले नाही. या प्रकरणी अशोक महाडेश्वर यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

 राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौध्दवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच घरे फोडुन चोरट्यानी एकूण ४ लाख ४३ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. सकाळी हा प्रकार याबाबतची माहिती येतील ग्रामस्थानी राजापूर पोलीसाना देताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व त्यानीं तात्काळ पंचनामा केला आहे.

ही सर्व घरे बंद होती,. महाडेश्वर हे कणकवली तालुक्यातील आपल्या तिवरे गावावरून येऊन जाऊन असत. तर अन्य घरे ही बंद होती. यातील महाडेश्वर यांच्या घरातुन रोख रूपये सहा हजार यासह अन्य सोन्याचे दागीने यामध्ये १५ ग्रॅम सोन्याची आईची गळयातील मन्याची माळ,.२४ ग्रॅमचा गळ्यातील सोन्याचा हार, १२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळुसत्र २ सोन्याचे कॉईन प्रत्येकी वजन ०५ ग्रॅम, २ ग्रॅम सोन्याचा एक कॉइन, ३ सोन्याचे कॉईन प्रत्येक ३ ग्रॅम वजनाचे, ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोल आकाराचा रिंग

५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे रिंग सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याची कुढी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, चंद्राची पैजण सुमारे पाच ग्राम वजनाची असा सुमारे ३ लाख ९३ हजार रूपयांचा ऐवज चोरटयांनी लाबविलरा आहे.

तसेच एड.।मुरलीधर मोरे याचे बंदस्थितीत असलेले घरात प्रवेश करुन चोरटयांनी चार चांदीच्या मुर्ती चार चांदीच्या मुर्तीच्या ४००००/- रुपये किंमतीच्या व त्यांची रोख रक्कम १००००/- रुपये अशी त्यांची एकूण रक्कम ५००००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. तर योगेश सुरेश मोर, अविनाश तावडे व शशिकांत लाड यांची बंद घरे फोडून् चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र या तीन घरांमध्ये चोरटयांच्या हाती काहीच लागलेले नाही.

या प्रकरणी अशोक महाडेश्वर यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. आपले दागिने व रोख रक्मम अशी एकूण ३,९३,०००/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेलेली आहे. तसेच आमचे शेजारी राहणारे मुरलीधर मोरे यांचे बंदस्थितीत असलेल्या घरातून चार चांदीच्या मुर्तीच्या ४००००/- रुपये किंमतीच्या व त्यांची रोख रक्कम १००००/- रुपये अशी त्यांची एकूण रक्कम ५००००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. अशी आमची दोघांची चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम मिळून एकूण ४,४३,०००/- रुपये किंमतीची चोरी झालेली आहे. असे महाडेश्वर यांनी आपल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी करत तपास कामी मार्गदर्शन केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव तपास करत आहेत.

श्वानाने महामार्गवरील पुलापर्यंत माग काढला

या घटनेनंतर तात्काळ पोलीसांकडून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाने चोरी झालेल्या घरांपासून मुंबई गोवा महामार्गावरील कोंडये येथे पुलापर्यंत माग काढला आहे. या ठिकाणी हा श्वान घुटमळला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून आले असावेत वा त्यांनी यासाठी दुचाकीचा वापर केला असावा असा पोलीसांचा कयास आहे. या प्रकरणी ठसे तज्ञांना पाचारण करून ठसेही घेण्यात आले आहेत.

चोरटे सराईत असण्याची शक्यता

ही पाचही घरे बंद होती, याबाबत कदाचित चोरटयांनी रेकी केली असावी असाही पोलीसांचा कययास आहे. कटावणीने या सर्व घरांची लॉक चोरटयांनी तोडली आहेत,. त्यामुळे ते सराईत चोरटे असावेत असा त्यांनी चोरी करताना वापरलेल्या क्लुप्त्या पहाता पोलीसांना कयास आहे.

बंद घर मालकांनी खबरदारी घेणे आवश्यक

राजापूर तालुक्यातच नाही तर संपुर्ण कोकणात ग्रामीण भागात अनेक घरे ही बंद असतात, शिमगोत्सव व गणपती सणाच्या कार्यकाळात ही घरे गजबजतात. त्यामुळे अशी बंद घरे हेरून चोरटे रेकी करून अशा चोऱ्या करण्याचा प्रयत्न करत असतात. तरी अशा प्रकारे घरे बंद करून जाताना आपल्या घरातील मौल्यवान वस्तु या सोबत घेऊन जाव्यात, अथवा बँकांची लॉकर सुवीधा घेऊन त्यामध्ये त्या ठेवाव्यात,. घरात कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तु, रोख रक्कम ठेऊ नये असे आवाहन राजापूर पोलीसांनी केले आहे. तर सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार केला जावा असेही आवाहन पोलीसांनी केले आहे. कोंडये येथें जर का एखाद्या घराच्या बाहेर जरी सीसीटीव्ही कॅमेरा असता तर आज तातडीने चोरटयांना पकडण्याबाबत कार्यवाही करता आली असती असेही पोलीसांनी सांगितले. मात्र तरीही सर्व बाजुने तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

राजापूर तालुक्यात अगदी महामार्गालगतच एकाच रात्रीत पाच बंद घरे चोरट्यानी फोडल्याने खळबळ उडाली असून या चोरीच्या तपासाचे कडवे आव्हान राजापूर पोलीसांना पेलावे लागणार आहे.