कोकरे गटात उबाठाला जोरदार धक्का

उबाठाच्या शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

आमदार शेखर निकम यांनी केले सर्वांचे स्वागत

चिपळूण (प्रतिनिधी):—कोकरे गटात उबाठाला जोरदार धक्का बसला आहे. मोरेवाडी येथील उबाठाच्या शेकडो शिवसैनिकांनी आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून कोकरे गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व या प्रवेशाने वाढले आहे.

 

सध्या राज्यात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे. खास करून उबाठामधून मोठ्या प्रमाणात नेते पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मात्र, चिपळूणमध्ये उबाठाच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला पसंती देत आ. शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करीत असून कोकरे येथील उबाठाच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

 

कोकरे मोरेवाडी येथील गावकर बालकृष्ण मोरे दिलीप मोरे, विलास मोरे, अशोक मोरे, शाखाप्रमुख प्रशांत मोरे आदी शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केला आहे. कोणतीही मागणी अथवा अपेक्षा न ठेवता उबाठाच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उबाठाला धक्का दिला आहे.

 

यावेळी आ. शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नागेश साळवी, निलेश कदम, संजय कदम, निलेश खापरे, संजय घडशी, अंकुश बुधर, विजय भुवड, दत्ताराम गुजर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी सांगितले की, तुम्ही ज्या विश्वासाने पक्षात आलात तो विश्वास सार्थ ठरेल. मुळात तुम्ही येण्यास उशीर केलात. मात्र, तरीही काही हरकत नाही. आज तुमचा गाव गुहागर मतदार संघात आहे. चिपळूण मतदार संघात विकासाचे चित्र आ. शेखर निकम यांच्यामुळे वेगळे दिसते आहे. तुमच्या गावात आपण खा. सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून विकासाची कामे करू. शिवाय राज्यात सत्ता आपली आहे. त्या माध्यमातून ही विकासाची कामे केलो जातील, असे स्पष्ट केले.