चिपळूण (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे कापसाळ येथील शिवनदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने आणि त्यातच पादचारी साकवावरही वडाचे भलेमोठे झाड कोसळल्याने रविवारी गावातील तीन वाड्यांचा संपर्कच तुटला. पहिल्या पावसातच अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने ग्रामस्थही भयभीत झाले आहेत. पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढताच दरवर्षी या गंभीर समस्येला ग्रामस्थांना सामारे जावे लागत असून जीव मुठीत घेऊन विद्यार्थी, महिलांसह वयोवृध्दांना ये-जा करावी लागत आहे.
या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी गेली कित्येक वर्षे सरपंच सुनिल गोरिवलेंसह कापसाळवासीय करत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हाकेवर कापसाळ गाव वसले आहे. या गावातील पायरवाडी, फणसवाडी व गायकरवाडी या तीन वाड्यांमध्ये जवळपास दोन हजार लोकांची वस्ती आहे. तर एक जिल्हा परिषद शाळा, दोन अंगणवाड्या, ग्रामदेवता श्री सुकाई देवीचे मंदिर आहे. महामार्ग ते या वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर शिवनदीवर कित्येक वर्षांपूर्वी छोटा पूल बांधण्यात आला होता. मात्र, या पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाचा काही प्रमाणात जोर वाढला तरीही या पुलावरून पाणी वाहते. तर याच भागात लोखंडी पादचारी साकव आहे. मात्र, या साकवाला साठ ते सत्तर वर्षे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. या साकवावर चार ते पाच दिवसांपूर्वी वडाचे झाड कोसळले होते. त्यामुळे साकव नादुरूस्त झाला असून धोकादायक बनला आहे. त्यातच रविवारी कोसळलेल्या पावसात पुलावरून पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद झाला. परिणामी, ग्रामस्थांसह नोकरदार वर्गाची मोठी अडचण झाली. सरपंच सुनिल गोरिवले यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साकवावर कोसळलेले झाड ग्रामस्थांच्या सहकार्यातून बाजूला केले. या रस्त्यावरून पहाटेपासून रात्रीपर्यंत रहदारी असते. त्यामुळे या मार्गावर नव्याने पूल उभारला जावा, अशी मागणी खा. सुनिल तटकरे, ना. अदिती तटकरे यांच्यासह ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे.












