शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
बांदा : बांदा येथील पीएम श्री केंद्रशाळा बांदा नंबर १ मध्ये पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना शाळेच्या वेळेत घडली असून, यामुळे शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर प्रशालेच्या गेटच्या बाहेर कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सदर विद्यार्थ्याला रडताना पाहून सामाजिक कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी आणि साई करमळकर यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर, पुढील उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या घटनेवर ओंकार नाडकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थी शाळेबाहेर कसा गेला, तसेच या घटनेची शिक्षकांना कोणतीही माहिती कशी नव्हती, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.











