फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ दिनांक ०६ जुन २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. मिलिंद पडळकर, प्रमुख अतिथी म्हणून श्री. मनोज भांडुरगे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी मान्यवरांची स्वागत केले
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फिनोलेक्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. मिलिंद पडळकर यांनी विद्यार्थी दशेतल्या नेतृत्व आणि सभाधीटपणाचा उपयोग पुढे करियर मध्ये कसा होतो हे विशद केले तसेच आपण जिथे घडलो त्या महाविद्यालयाला विसरता कामा नये असेही सांगितले. त्याचबरोबर जिद्द, चिकाटी ही यश मिळवण्यासाठी कशी महत्वाची आहे याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्री. मनोज भांडुरगे यांनी नोकरी व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच आवश्यक कौशल्ये विशद केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि यशस्वी भविष्यासाठी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग वीथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आणि एम.सी.ए. अशा विविध अभियांत्रिकी शाखांच्या सुमारे १७० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. मनोज भांडुरगे, डॉ. मिलिंद पडळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्यासह डीन अॅकॅडमिक्स डॉ. मिलिंद यादव, डीन फॅकल्टी डॉ. संजय कुलकर्णी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शना बापट यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रल्हाद सोमण, श्री. प्रसन्न साठे आणि सहकारी प्राध्यापकांनी प्रयत्न केले.












