कोकणात ‘कोकण सुवास’ चा दरवळ…!
कोकणात सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. पूर्वी कोकणातील सर्वच गावातून भातशेती मोठ्याप्रमाणावर केली जायची. अखंड कोकण भातशेतीने बहरलेलं हिरव कोकण होतं. परंतु गेल्या काहीवर्षामध्ये भातशेती कोकणातील शेतकऱ्यांनी कमी केली. भातशेतीत काम करायला फारसे कोणी उत्सुक नव्हते. शेतकऱ्यांना भातशेतीत कामगारही मिळेनासे झालेत. यामुळे सहाजिकच भातशेतीच क्षेत्र कमी झालं आहे. काही शेतकऱ्यांनी ज्याठीकाणी माळरान जमीन होती त्याठिकाणी आंबा, काजू, रतांबा लागवड करण्यात आली. यामुळे मधल्या काही वर्षात भातशेती किफायतशीर होत नाही. यामुळे भातशेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. पारंपारीक पद्धतीने भातशेती केली जात असल्याने त्याकाळी भातशेतीतून जेमतेम कुटुंबांचा वर्षभर पुरणारा तांदुळ मिळायचा. परंतु या भातशेतीत घ्यावे लागणारे कष्ट हे अफाट आहेत. मेहनतीच्या तुलनेत शेतकऱ्याला काही मिळत नाही याचा हिशोब जेव्हा शेतकरी मांडू लागला तेव्हा निश्चितच त्याला कळून चुकले की भातशेती किफायतशीर होत नाही. परंतु वडिलोपार्जित शेती असल्याने अनेक गावातून शेतकरी शेती करीत होता. शेतात राबणारी कुटुंबातली माणसच नोकरी, व्यवसायाच्यामागे गेल्याने शेतात काम करणारी गावातच माणस उरली नाहीत. त्यातही पारंपारीक भात बियाण्यांचा वापर जास्त होत होता. परंतु अलिकडे मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने बाजारात आलेल्या बियाण्यांचा वापर करीत भात उत्पादन घेतले जात आहे. पूर्वी कोकणकृषी विद्याविठाने विशेष करून काजूच्या अनेक जातींची निर्मिती केली. वेंगुर्ले-७ या काजू ‘बी’ च उत्पन्न शेतकऱ्याला चांगलच फायदेशीर ठरत आहे. कोकणकृषि विद्यापिठाने ज्याकाही काजूच्या विकसित केलेल्या जाती आहेत. त्यामुळे काजू उत्पादनात निश्चितपणे कोकणात मोठी वाढ झाली आहे. भाताच्याबाबतीतही कोकण कृषी विद्यापिठाकडून सतत प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्याचे आर्थिक स्त्रोत वाढावेत हाच त्यामागचा हेतू आहे. कोकणकृषि विद्यापिठ विविध फळांच्याबाबतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. भाताच्याबाबतीतही रत्नागिरी आठ रत्नागिरी २४ अशा भाताच्या नवीन जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. कोकणकृषि विद्यापिठाच्या रत्नागिरी जवळील शिरगाव संशोधन केंद्रात कोकणसाठी एक वेगळे भाताचे वाण विकसित करण्यात आले आहे. ‘कोकण सुवास’ असे या नव्या भाताच्या वाणाचे नाव आहे. कृषि विद्यापिठाच्या शिरगाव-रत्नागिरी येथील संशोधन केंद्रात या कोकण सुवास या वाणाला निर्मितीसाठी तब्बल दहा वर्षाचा कालावधी लागला आहे. २०१५ पासून शेती संशोधन केंद्रात या भात बियाण्यावर अभ्यास सुरू होता. तब्बल १० वर्षाच्या प्रयत्नानंतर विद्यापिठाने कोकण सुवास हे वाण निर्माण केले. या भाताला सौम्य सुवास येतो. बासमतीवर संशोधन केंद्रात गॅमा किरणांची प्रक्रिया करण्यात आली. यातूनच ही सुवासिक जात निर्माण करण्यात आली. तब्बल दहावर्षे बासमतीवर संशोधन करून कोकण सुवासच वाण निर्माण करण्यात आलं आहे. कोकण सुवासची ही हळवी जात आहे. ११५ ते १२० दिवस या कोकण सुवास भात तयार व्हायला जातात. सर्वसाधारणपणे ११५ ते १२० दिवस भात तयार होण्यासाठी लागतात. विशेष म्हणजे कोकण सुवासच्या या वाणाला महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापिठांच्या संयुक्त कृषि समितीने मान्यताही दिली आहे. पूर्वी कोकण हे भाताच आगर मानल जायच. पूर्वीच्याकाळी पूर्णपणे भातशेती शेणखत, पालापाचोळा या सेंद्रिय खतावरची होती. रासायनिक खतांचा वापर होत नव्हता. यामुळे त्याकाळच्या पिकांनाही महत्व होतं. मधल्याकाळात जरी भातशेतीकडे दुर्लक्ष होतं गेलं असलं तरीही अलिकडे नव-नवीन जास्त उत्पादन देणारी बियाणी शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नवी पिढी करू लागली आहे. काही तरूण गावांमध्ये भातशेती करताना दिसतात, चांगल उत्पादनही घेतात. कोकणातील काही तरूण शेतकऱ्यांच्या शेतातून काही नवीन करून दाखविण्याच्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहेत. कोकणातील तरूण शेतात जातच नाहीत. तरूणांना कष्टच करायला नको असो जो काही एक गैरसमज पसरविला गेला आहे. त्याला छेद देण्याचे काम आजचा तरूण काही गावातून शेतीत प्रयोगशीलता आणून दाखवत आहे. भात उत्पादन अधिकाधिक घेऊन उत्पन्न वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. कोकण हे फळपिकाबरोबरच भातशेतीला आवश्यक असणारी सकसता इथल्या मातीत आहे. त्यामुळे पूर्वीपासून कोकण हे त्यामुळे पूर्वीपासून कोकण हे भातपिकासाठी प्रसिद्धच आहे. रायगड जिल्ह्यात तर फार पूर्वीपासून सर्वाधिक भात पिकवल जात. फार पूर्वीपासून रायगड जिल्हा हा भातशेतीसाठी प्रसिद्धच आहे. भातशेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. भरपूर शेती करायची, भाताच विक्रमी उत्पादन घ्यायची वेळ पडली तर यावर्षी पिकवलेलं भात पुढच्या वर्षाला देखील पुरेल अशा पद्धतीच नियोजन असायचे प्रत्येकाच्या घरात, कुटुंबात पुरेसा तांदुळ असायचा त्यामुळे कोकणातील शेतकरी समाधानी वृत्तीने जीवनाची वाटचाल करणारा श्रीमंत मनाचा शेतकरी नेहमीच आनंदीच असतो. कोकणकृषी विद्यापिठाच्या या नव्या भाताच्या संशोधनाचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. आजही ज्या कुटुंबातून भातशेती केली जाते त्या कुटुंबानसाठी ‘कोकण सुवास’ हे भाताच नवीन वाण निश्चितच कोकण वासियांच्या जेवणाच्या ताटातील लज्जत वाढविणारीच आहे. मात्र, या सर्व नवीन तंत्रज्ञान, संकरीत भात बियाण्यांची निर्मिती असं सर्वच नवनवीन काही होत असताना कोकणात भातशेतीच क्षेत्र आणखी वाढल पाहिजे हे खर आहे. मात्र, या भातशेतीच्या बाबतीतही माकड, गवारेडा, रानडुक्कर या वन्य प्राण्यांकडुनही तितकाच आणि तसाच त्रास होताना दिसतो. वन्यप्राण्यांच्या एका एट्रीने सारं काही होत्याच नव्हत होत. यामुळे देखील शेतकरी हवालदिल आहेत आणि नाराजही आहेत. एकदा हा शेतात हे वन्य प्राणी आले की शेतकऱ्याच्या अपार मेहनत आणि कष्टावर पाणी फेरण्याचे काम हे वन्यप्राणी करताना दिसतात. यातच परत निसर्गाच ऋतुचक्रदेखील विचित्रपणे सुरू आहे. कधीही पाऊस कोसळतो. कडक उन्हाळा येतो. यामुळे कशाच काहीही खर नाही. सारीच अस्थिरता याच अस्थिरतेमुळे कोकणातील शेतकरी शेती क्षेत्राकडे वळतानाही विचार करतो कोकण भविष्यात ‘कोकण सुवास’ ने दरवळेल अशी आजच्याघडीला अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.












