नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू
खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून धरण क्षेत्रामध्ये जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सरासरी १५०० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील ज्या भागांना उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. त्या गावांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदा २० मे पासूनच पावसाने सुरुवात केल्याने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात ओव्हर फ्लो होणारी धरणे जुन महिन्याच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली तरी नियमित पावसाची हजेरी लागत असल्यामुळे यावर्षी धरणात पुरेसा पाणी साठा होईल अशी अशा व्यक्त होत आहे.
तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडीवली धरण, पंधरागाव विभागात तळवट – शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्णत्वास नेले आहेत. मात्र नातूवाडी व शिरगाव धरण वगळता अन्य धरणातील पाण्यातून किती हेक्टर शेत जमीन ओलिताखाली येते हा संशोधनाचा भाग आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या धरणात पाणीसाठा दरवर्षी होत असतो. परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होणे अपेक्षित आहे. यावर्षी २५ जुन पर्यंत तालुक्यातील तळवट धरणात :४.६७ द.श ल.घ.मी., शेलारवाडी धरणात : ८.०४६द. ल.घ.मी., नातूवाडी धरणात : १८.३७७ द. ल.घ.मी., पिंपळवाडी धरणात : १७.९४८ द. ल.घ.मी., कोंडीवली धरणात २.५५५द.ल.घ.मी, शिरवली धरणात ३.३६५ व.ल.घ.मी एवढा पाणी साठा आहे. तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरवली लघु पाटबंधारे व पिंपळवाडी लघु पाटबंधारे तीनही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. शेलारवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प ५१.३५ टक्के भरला असून तळवट धरणामध्ये देखील ७२.३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र नातूवाडी व शिरवली धरण सोडले तर अन्य धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी किती प्रमाणात होतो हे तपासले तर त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळते. पिंपळवाडी धरणातील पाण्यावर खासगी वीज निर्मिती प्रकल्प आहे. मात्र शेतीसाठी या पाण्याचा वापर करण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
धरणाच्या सांडव्या वरुन विसर्ग सुरू
नातुवाडी धरण – ता. २४ जुन २०२५ रोजी दुपारी ३ वाजता,
शिरवली धरण – ता. १५ जुन २०२५ रोजी पहाटे ५ वाजता,
पिंपळवाडी धरण – ता. १७ जुन २०२५ रोजी सकाळी १० वाजता
खेड तालुक्यातील धरणे व त्यांची महत्तम पाणी साठवण क्षमता पुढील प्रमाणे :-
नातूवाडी(१८.३७७ दलघमी),
तळवटपाल(४.८५दलघमी),
कोंडीवली(२.९६१ दलघमी),
शिरवली धरण(२.९९७ दलघमी),
शेलरवाडी(१०.१४ दलघमी),
पिंपळवाडी (१८.८९५ दलघमी)










