मान्सूनपूर्व कामांतील दिरंगाईमुळे वीज समस्येबाबत आ. केसरकर आक्रमक

अधिकाऱ्यांना दिले तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

सावंतवाडी । प्रतिनिधी : मान्सूनपूर्व कामांतील दिरंगाईमुळे कोकणातील वीज समस्येने त्रस्त नागरिकांचे हाल होत असल्याबद्दल माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोडामार्ग येथील उपकार्यकारी अभियंता विशाल हंत्तरगी यांनी मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नसल्याची कबुली दिल्यानंतर, केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील अभियंत्यांना वीज समस्यांबाबत धारेवर धरले. “कोकणातील लोक कधीही संयम सोडत नाहीत, त्यामुळे परिस्थिती बदला, त्यासाठी लागेल ते करा. पैसा, सामग्री कमी पडल्यास मला सांगा, पण लोकांचे हाल करू नका,” असे स्पष्ट निर्देश आमदार केसरकर यांनी दिले.

सावंतवाडी नगरपरिषद सभागृहात सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व कामांतील दिरंगाईची कबुली

बैठकीत दोडामार्ग उपकार्यकारी अभियंता विशाल हंत्तरगी यांनी प्रांजळपणे कबूल केले की, मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नाहीत. ते म्हणाले, “तुमच्याशी खोटं बोलणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.” मात्र, ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, कंत्राटदारांच्या टीम कार्यरत आहेत. कामांसाठी वाहन, ट्री कटर आणि इतर सामग्रीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर, केसरकर यांनी समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले.

शहरी भागातील समस्या आणि अंडरग्राऊंड केबलिंगचा प्रस्ताव

सावंतवाडी शहरातील सततच्या वीज खंडित होण्याबाबत आमदार केसरकर यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना जाब विचारला. शहरी भागात विद्युत पुरवठा सतत का खंडित होतो, असा सवाल त्यांनी केला. तसेच, अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचे सांगून, ही योजना झाल्यावर समस्या थांबतील अशी आशा व्यक्त केली. शहरात पुन्हा सतत वीज जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आंबोली आणि चौकुळसारख्या दुर्गम भागात टीम कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहर अभियंत्यांनी झाड पडल्याने मोठ्या समस्या येत असल्याचे सांगितले, तर इतर समस्या सोमवारी दूर केल्या जातील अशी माहिती दिली.

वेंगुर्ला येथील ट्रान्सफॉर्मर आणि पॅनलचा मुद्दा

वेंगुर्ला येथील अंडरग्राऊंड केबलिंगसाठी उभारलेल्या पॅनलमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला. अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याने ते आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊनही कामे का पूर्ण होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. आमदार केसरकर यांनी कोट्यवधी रुपये दिले असतानाही काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. “आमच्यासारख्यांची महावितरणचे अधिकारी दिशाभूल करत आहेत आणि त्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही,” असे वालावलकर म्हणाले. आमदार केसरकर यांनी यात मध्यस्थी करत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. सावंतवाडी रेल्वे स्थानक येथील ट्रान्सफॉर्मर का बदलला नाही, असा सवालही केसरकर यांनी केला.

त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश

यावेळी केसरकर यांनी दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. चांगले ट्री कटर आणि वाहने देण्याचे काम आपण करत असून, तोपर्यंत भाडेतत्त्वावर गाड्या पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही डिव्हिजनना तीन वाहने तात्काळ देण्यात येतील. वीज समस्या सोडवण्यासाठी गावात कार्यरत असणाऱ्या टीमसाठी निवास व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. “कोकणातील माणूस कधीही संयम सोडत नाही, त्यामुळे लोकांचे हाल करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. लोकांचे फोन उचलले जावेत आणि वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्याची कल्पना द्यावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला तिन्ही तालुक्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नेते अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सत्यवान बांदेकर, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.