भुईबावड्यात उबाठा पुरस्कृत उमेदवाराचा भाजपाला पाठिंबा
भाजपाचे उमेदवार देवानंद पालांडे यांची प्रचारात आघाडी
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडीत उबाठा सेनेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उबाठाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.
तालुक्यात उबाठा च्या अडचणी एकापाठोपाठ एक वाढत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला कोकीसरे पंचायत समिती मतदारसंघासाठी उमेदवार उपलब्ध झाला नाही. त्यांनंतर कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा चे अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरला.या घडामोडीनंतर येथील डमी उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे बिनविरोध निवडून आले. त्यानंतर आता भुईबावडा पंचायत समितीसाठी उबाठा पुरस्कृत उमेदवार असलेल्या वसंत मोरे यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने उबाठा गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे.
श्री. मोरे यांनी आज रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे नासीर काझी, भालचंद्र साठे, किशोर कांबळे, स्वप्नील खानविलकर, मनोज परब, रविंद्र गुरव, विलास कदम, प्रताप पालांडे, पांडुरंग जाधव, धनाजी हडशी, प्रथमेश पालांडे, ओंकार पाटील, प्रसाद पालांडे, प्रथमेश देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री.मोरे म्हणाले, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही. मी ३५ वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले होते. मात्र पक्षाकडून माझा विश्वासघात करण्यात आला. त्यामुळे मी पालकमंत्री नितेश राणेंचे नेतृत्व मानून भाजपाला पाठींबा देत असल्याचे सांगितले.
या घडामोडींमुळे या मतदारसंघात भाजपाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.












