वेंगुर्ले l प्रतिनिधी :आजगाव सिंधुदुर्ग येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ५६ वा मासिक कार्यक्रम मांद्रे-गोवा येथील साहित्य संगम यां संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि.२९ जून रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मधलावाडा, पालये येथे महेंद्र परब यांच्या निवासस्थानी होत आहे. साहित्य संगमचा हा ४२१ वा मासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात ‘साहित्य संगम’ चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर यांच्या ‘कै. रवींद्र पिंगे यांचे चरित्र आणि साहित्य’ या विषयावरील बीजभाषणाने साहित्य संगम च्या विशेष वार्षिक उपक्रमाचा शुभारंभ होईल.
सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या सध्या चालू असलेल्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या कार्यक्रमात ‘जयवंत दळवी समजून घेताना…’ या विषयांतर्गत ‘कै.जयवंत दळवी यांचे चरित्र आणि साहित्य’ या संदर्भात दळवींचे पुतणे तथा उद्योजक सचिन दळवी आणि साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत साहित्यिक विनय सौदागर बोलतील. या कार्यक्रमात ‘साहित्य संगम’ च्या यु ट्यूब चॅनलचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
तरी सर्व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे,अशी विनंती दोन्ही संस्थेतर्फे करण्यात आली आहे.













