हिंदी भाषा मुद्यावरील ‘ठाकरे बंधूंचे’ अस्त्र बोथट : ॲड. परिमल नाईक 

सावंतवाडी : मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका जवळ येत असताना, मराठी भाषा आणि हिंदी भाषेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादास सुरुवात झाली आहे. विशेषतः, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य एकजुटीच्या पार्श्वभूमीवर, ‘हिंदी भाषेची सक्ती’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी काढलेले हे ‘हिंदी भाषा सक्ती’चे अस्त्र बोथट ठरु शकते.

 

*शिवसेनेचा मूळ आधार आणि सद्यस्थिती*

शिवसेनेची स्थापना ‘मराठी’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन मुख्य स्तंभांवर झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच शिवसेनेला राज्य आणि केंद्र स्तरावर यश मिळाले. मात्र, २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेनेने (उबाठा गट) मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांना तिलांजली दिल्याची टीका होत आहे. यामुळेच त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांसह दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

 

*मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोरील आव्हाने*

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मराठी माणसांबद्दल कळवळा नव्हता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावेळी मराठी माणसाचे हित महत्त्वाचे वाटले नाही आणि बाळासाहेबांच्या प्रेमापोटी मराठी माणसे आपल्या मागे येतील, असा उद्धव ठाकरे यांना विश्वास होता मात्र तो फोल ठरला.

सद्यस्थितीत, मनसेकडे एकही आमदार किंवा राज्यात एकही स्थानिक स्वराज्य संस्था नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कसेबसे २१ आमदार असले तरी, बहुतेक ठिकाणी त्यांची सत्ताकेंद्रे नाहीत. मुंबई महानगरपालिका टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मागील सत्तेच्या काळात मराठी कंत्राटदारांना किती कंत्राटे मिळाली, किती मनपा शाळांचा विकास झाला, किती मराठी खासदार राज्यसभेवर पाठवले आणि मराठी तरुणांना किती रोजगार दिला, या प्रश्नांवर त्यांना निरुत्तर व्हावे लागेल .

मनसे नेते राज ठाकरे यांच्यासमोरही मोठी आव्हाने आहेत. त्यांना कोणताही मित्रपक्ष नाही, ग्रामपंचायतींमध्येही साध्या सदस्यांची वानवा आहे. सभांना लक्षणीय उपस्थिती असली तरी, मतांच्या झोळीत ठणठणाट आहे आणि बहुतेक ठिकाणी उमेदवार मिळणेही कठीण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य असल्याने या सर्व घटनांना तोंड कसे द्यावे, हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे.

 

*हिंदी सक्ती आणि वस्तुस्थिती*

हिंदी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची आहे का, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ‘माशेलकर अहवाल ‘ स्वीकारून त्रिभाषिक सूत्र धोरण स्वीकारले होते. मग त्यांना हिंदी भाषेव्यतिरिक्त मराठी-इंग्रजी सोडून तिसरी कोणती भाषा (उर्दू) प्रिय होती, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

हिंदी भाषेला वादाच्या भोवऱ्यात टाकणाऱ्या किती मराठी राजकारण्यांच्या मुलांनी मराठीत शिक्षण घेतले किंवा किती राजकारण्यांनी मराठी शाळा काढण्यासाठी पुढाकार घेतला, हा देखील संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले जात आहे. मराठी भाषेचे प्रगती पुस्तक तपासल्यास भाषावाद निर्माण करणारे आणि त्याचा गैरफायदा घेणारे स्वार्थी राजकारणी लोकांचे पितळ उघडे पडेल.

 

*राष्ट्रीय एकात्मता आणि भाषिक धोरण*

अलीकडेच काही हिंदी भाषा द्वेषी राजकीय वक्त्यांच्या विधानांचा परामर्श घेता, हिंदी भाषेला परराष्ट्रीय भाषा असल्याप्रमाणे तोलण्यात येत आहे. भारतीय संविधानातील कलम १२१ नुसार, भारतीय संसदेच्या सर्वोच्च सभागृहात (संसदेत) केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा अधिकृत आहेत. इतर प्रांतिक भाषा केवळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने प्रश्नोत्तरांसाठी मर्यादित आहेत. सर्व कामकाज आणि त्याचे पटल हे केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांतच असते.

अशा परिस्थितीत, हिंदी राष्ट्रीय भाषा आहे किंवा नाही यावर विनाकारण वादविवाद करण्याऐवजी, देशाच्या सर्वोच्च विधिमंडळातील अधिकृत हिंदी भाषेला देशातील सर्वच राज्यांनी स्वीकारले पाहिजे (सक्ती नाही) ही भूमिका देशहितासाठी घेणे काळाची गरज आहे.

 

*राजकीय खेळी आणि मराठी अस्मिता*

मोर्चेकऱ्यांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वानांचा भाषा विषयक वाद निर्माण करून मराठी मतदारांची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. प्रगत वैचारिक परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनतेला याची पूर्ण जाण आहे की, ‘ठाकरे ब्रँड’ जो अस्ताकडे चालला आहे, त्याला उजळ करून मुंबई महानगरपालिका आणि जमल्यास राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेची फळे चाखता यावीत, यासाठी मराठी भाषा प्रेम आणि हिंदी भाषा द्वेष असे संमिश्र विष पेरून ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बांधण्यात येणारा हा तकलादू ‘सेतू’ आहे.

मराठी भाषा ही साधूसंतांनी उजळ केलेली मातृभाषा आहे आणि तिचा दर्जा अभिजात आहे. मराठी भाषेवर घाला घालण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आणि तिचे पावित्र्य अबाधित राखताना राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न स्वार्थी राजकारण्यांनी करू नये.

 

 

*माझी मराठी*

मोलाची माझी मराठी भाषा,

गोड गोजिरी मायाळू आशा।

शब्दाशब्दांतून झिरपत जाते,

मायमाऊलीची प्रेमळ वाचा॥

भक्तीची गाथा, वीरांची गाणी,

संतांचे शब्द, शूरांची कहाणी।

शिवरायांची तलवार झाली,

झणझणीत मराठीची तीच नाणी॥

कधी कुसुमाग्रज, कधी बा.सी.मर्डे,

कवितेच्या रागात वाहते शब्दांचे झरे।

कधी विंदा, कधी मंगेश,

भावनांना घालतात ते साजेश॥

बोलताना तुझ्या शब्दांचा गंध,

लाजवेल जणू चाफा-चंदन।

गौरव तुझा नित्य मनामध्ये,

तूच मज देश, तूच माझं धन॥

संवर्धन तुझे करीन नित्य,

जगासमोर नेईन तुझं तेजस्वित्व।

माझी ओळख, माझा अभिमान,

मराठी भाषा – माझं जीवनगाण॥