६ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव थाटात साजरा होणार
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील- खेंड विभागातील श्रद्धास्थान असलेल्या श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन मंदिर प्रथमच दर्शनासाठी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. १२५ वर्षांच्या इतिहास असलेल्या या मंदिरात यंदाची आषाढी एकादशी (रविवारी दिनांक ६ जुलै २०२५,) मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम नव्याने पूर्ण झाले आहे. मंदिराच्या नव्या रूपात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्यातर्फे करण्यात आले आहे. उत्सवानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, पालखी सोहळा आयोजन हे कार्यक्रम होणार आहे. मंदिराचा नव्या स्वरूपातील भव्य नकाशा आणि रचना भक्तांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे. सदर उत्सवासाठी अध्यक्ष व सदस्य, श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड(ता. चिपळूण) यांनी भाविकांना प्रेमपूर्वक निमंत्रण दिले आहे. श्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात, या आषाढी एकादशीला भक्तीमय वातावरणात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.