चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील पेंटिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. आयुष कदम याची प्रतिष्ठेच्या कला शिबिरासाठी निवड झाली आहे. कॅमल आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणारे हे शिबिर ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत शासकीय कला महाविद्यालय, नागपूर येथे होणार आहे. या निवडीमुळे आयुषला विविध कलावंतांशी संवाद साधण्याची, त्यांच्या कलाकृतींचा अभ्यास करण्याची तसेच चित्रनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून त्याला चित्रकलेतील विविध तंत्रे, कलात्मक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेच्या नव्या संकल्पना जाणून घेता येणार आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव, सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्य यांच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हे शिबिर आयुषसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या शिबिरामुळे त्याच्या कलागुणांना अधिक वाव मिळून कलाक्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आयुषच्या या निवडीबद्दल आ. शेखर निकम तसेच सह्याद्रि शिक्षण संस्था उपाध्यक्ष डॉ. इसाक खतिब, सौ. युगंधरा राजेशिर्के, प्रशांत निकम (उपाध्यक्ष-सह्याद्रि शिक्षण संस्था), अनिरुद्ध शेखर निकम (कार्याध्यक्ष -सह्याद्रि शिक्षण संस्था), महेश मनोहर महाडिक ( सेक्रेटरी – सह्याद्रि शिक्षण संस्था) कला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राद्यापक वर्ग, कर्मचारी यांनी कौतुक आणि शुभेच्छा दिल्या.













