चिपळूण (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद आदर्श शाळा कळंबस्ते येथे घेण्यात आली. प्रारंभी कळंबस्ते शाळेच्या शिक्षिका सुनिता हळदे यांनी केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव, सर्व मुख्याध्यापक, उपस्थित शिक्षक व ऐश्वर्या रेडिज यांचे स्वागत केले.
केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव व कळंबस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल शिंदे, डॉ.सुधा भारद्वाज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर पिंपळी बुद्रुक शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुश्राव्य आवाजात प्रार्थना सादर केली. यानंतर सूक्ष्म शारीरिक हालचाली घेऊन मानसिक ताण कमी करून कामाची सुरूवात करण्यात आली. गटकार्य करण्यासाठी उपस्थित शिक्षकांची इयत्तानिहाय आकर्षक पध्दतीने बैठक व्यवस्था करून गटांची निर्मिती करण्यात आली. माहे जुलै २०२५ च्या कृती आराखड्यानुसार अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन शिक्षण परिषदेत वर्गनिहाय तयार करण्यात आले. तयार केलेल्या नियोजनाचे गटनिहाय सादरीकरण करण्यात आले. दुसऱ्या सत्रात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिक्षण परिषदेतील मासिक नियोजन आणि पालकांनी मुलांच्या सोबत घरी करायच्या कृती आराखडा अंमलबजावणी व सुधारणात्मक बाबींवर/ समस्यांवर चर्चा करून समस्या निराकरण करण्यावर भर देणे याविषयी केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांनी माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना – पुनर्गठण त्याचप्रमाणे शाळांवरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत शासन निर्णयाचे वाचन करून त्या संदर्भात माहिती देण्यात आली.
मुग्धा चिपळूणकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे गमक सांगुन क्लुप्त्यांबाबत मार्गदर्शन केले. सीआरजी सदस्यांची रचना, भूमिका व जबाबदारी याविषयी ग्यान प्रकाश फाउंडेशन प्रतिनिधीनी विजय माने यांनी माहिती दिली. प्रशासकीय कामकाजाबाबत केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांनी आढावा घेतला. या शिक्षण परिषदेसाठी चिपळूण गटशिक्षणाधिकारी प्रमोदकुमार शेंडगे, चिपळूण नंबर २ प्रभागाचे विस्तार अधिकारी रमाकांत पवार, वालोपे केंद्राचे केंद्रीय प्रमुख सुर्वे उपस्थित होते. कळंबस्ते शाळेतील उपशिक्षिका मुग्धा चिपळूणकर यांनी आभार मानले.













