प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी देवगडमधील माय-लेकावर गुन्हा दाखल

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचे वडील बाबू तावडे यांनी रविवारी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती.

शुक्रवारी प्रिया चव्हाण यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमधील बंद खोलीत ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रियाच्या आई-वडिलांनी आक्षेप घेत तिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली होती.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक यांनी सखोल तपास केला.

तपासानंतर, संशयित प्रणाली माने आणि तिचा मुलगा आर्य यांनी प्रियाचा मानसिक छळ केल्याचे समोर आले. या त्रासामुळे प्रिया गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दबावाखाली होती, असे तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

या जबाबाच्या आधारे, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रणाली मिलिंद माने आणि आर्य माने या दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.