वैभववाडी प्रतिनिधी
आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या नारायण केशव पाटील वय ७० रा. शिराळे या वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. कोकिसरे बोरचीवाडी येथील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला आहे. मयत नारायण पाटील हे १ जुलैपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली होती. परंतु ते सापडले नव्हते. यासंदर्भात आपले पती बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी वैशाली पाटील यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
मंगळवार दि. ८ जुलै रोजी रवी आकाराम शिवगण रा. नापणे यांना कोकिसरे बोरचीवाडी येथे नदीपात्रात अनोळखी समाजाचा मृतदेह आढळून आला. त्यानी याबाबतची माहिती पोलीस पाटील व स्थानिकांना दिली. दरम्यान घटनास्थळी वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अभिजीत तावडे, धनाजी धडे, किरण मेते घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रातील मृतदेह त्यांनी बाहेर काढला. व शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.











