कुडाळ : श्रीमती मनोरमा चौधरी यांचा २४ वा स्मृतिदिन श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे, कदमवाडी येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
गेली २४ वर्षांपासून श्रीमती मनोरमा चौधरी यांचा स्मृतिदिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रम, मतिमंद शाळा आणि रुग्णालयांमध्ये विविध वस्तू देऊन साजरा केला जातो. यंदाचा कार्यक्रम शोषित व पीडित मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या नाग्या महादू निवासी वसतिगृहात ६० ते ६५ मुलांसमवेत साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील मुलांनी प्रार्थना आणि समूह गायनाने पाहुण्यांचे स्वागत केले.
ट्रस्टतर्फे वसतिगृहाला धान्य आणि बिस्किट पॅकेट्स देण्यात आली. श्रीमती स्मिता नाईक, रेश्मा साळसकर आणि सीमा चौधरी यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष, श्री. चौधरी यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात असे प्राविण्य मिळवा की या वसतिगृहाचा डंका महाराष्ट्रासह देशात वाजला पाहिजे.” जिल्ह्यातील अशा मुलांना एकत्र करून हे वसतिगृह चालविणारे उदय आहिर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे ते म्हणाले. अनेक अडचणींवर मात करत उदय आहिर आणि त्यांची पत्नी हे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहेत. ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, जे स्वतः पाट विद्यालयात शिक्षक आहेत, त्यांनी मुलांना शैक्षणिक प्रगती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
पाहुण्यांचे आभार मानताना उदय आहिर यांनी मुलांसाठी करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि हे कार्य करताना शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी डॉक्टर अमेय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल आहिर यांनी त्यांचे आभार मानले. वसतिगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाला लोकांनी सढळ हस्ते मदत करावी, अशी अपेक्षाही आहिर यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला श्रीमती सीमा चौधरी, श्रीमती रेशमा साळसकर आणि श्रीमती स्मिता नाईक या आवर्जून उपस्थित होत्या.













